माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
वाढदिवस म्हटलं की केक,गोडधोड,सजावट आणि सेलिब्रेशन.पण काहीजण स्वतःचा आनंद समाजकल्याणात गुंफतात, असाच एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी प्रसंग नुकताच माणगाव उपजिल्हा रुग्णालयात घडला… जय आणि राज खाडे या दोन भावांनी आपल्या वडिलांचा ५० वा वाढदिवस संस्मरणीय करण्यासाठी पारंपरिक पद्धतीऐवजी समाजोपयोगी मार्ग निवडला.त्यांनी वडील संतोष खाडे यांच्या सन्मानार्थ उपजिल्हा रुग्णालय माणगावला ७०० सलाईन बॉटल्स दान केल्या. संतोष खाडे हे निजामपूरचे व्यवसायी स्थित,मात्र माणगाव मूळ रहिवासी असून सध्या माणगाव तालुक्यात रुग्णसेवक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निस्वार्थ सेवेचा ठसा मुलांवरही खोलवर उमटला होता.सरकारी रुग्णालयात सलाईनच्या अपुऱ्या पुरवठ्याची जाणीव असल्याने त्यांनी साठवलेल्या पैशांतून ही संवेदनशील मदत केली.या प्रसंगी संतोष खाडे भावुक होत म्हणाले“ही भेट केवळ मला नव्हे,तर माझ्या कार्याला मिळालेला सन्मान आहे. या पुढील जीवन समाजसेवेसाठी समर्पित राहील…
या उपक्रमाच्या वेळी उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ.अरुणा पोहरे, तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.त्यांनी खाडे कुटुंबाच्या या उपक्रमाचं मन:पूर्वक अभिनंदन केलं आणि हा प्रसंग संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असल्याचं सांगितलं.हा वाढदिवसाचा आगळा साजरा तरुणांसाठी एक नवा विचार घेऊन येतो…साजरेपणा केवळ वैयक्तिक न राहता,इतरांच्या जीवनातही आशा आणि आधार निर्माण करणारा असावा…