माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-
खांदाड गावालगत पुन्हा एकदा मगरींचा वावर चर्चेचा विषय ठरत असतानाच यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर मगरींची अंडी फुटून पिल्लांचा वावर आढळून आला आहे…शनिवारी,दिनांक १४ जून २०२५ रोजी सकाळी सुमारास काही युवकांना ही घटना प्रथम निदर्शनास आली…त्यांनी मोबाईलमध्ये मगरीच्या पिल्लांचे व्हिडिओ शूट करून सोशल मीडियावर शेअर केले…या पार्श्वभूमीवर स्थानिक युवक नेते बाळा पोवार यांनी यावर प्रतिक्रिया देताना हा प्रकार अत्यंत चिंतेचा असल्याचे सांगितले व योग्य ती उपाययोजना आणि अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करावा, असा इशाराच दिला…काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यानेही रात्रीच्या वेळी काळ नदीकाठी मगरीला स्पष्टपणे पाहिल्याचे सांगितले असून,परिसरातील रस्त्यालगत लावलेल्या फ्लड लाइट्समुळे ही बाब दिसून आली…येथे एक मंदिर असल्याने ग्रामस्थ व भाविकांचा नेहमी वावर असतो, त्यामुळे सुरक्षेचा मुद्दा अधिक महत्त्वाचा ठरत आहे…
स्थानिक युवकांनी झाडाझुडपांनी व गवताने अच्छादित ओलसर भागात मगरीच्या अंडी फुटल्याचे कवच व पिल्लांची हालचाल पाहिली…काही पिल्ले थेट नदीकडे जातानाही दिसली…अद्याप परिसरात प्रौढ मगरीचा वावर दिसून आलेला नाही…मागील दोन वर्षांत गावाच्या मोठ्या तलावात मगरींच्या हालचाली नोंदवण्यात आल्या होत्या…वनविभागाने यावेळी कुंपण व सूचना फलकही उभारले होते…तलावाचा काळ नदीशी थेट संपर्क नसला, तरी फक्त ३०० मीटर अंतर आहे.अतिवृष्टीमुळे नदी दुथडी भरून वाहते आणि सुमारे १००० मीटर परिसरात पाणी पसरते, त्यामुळे अशा जलचर प्राण्यांच्या स्थलांतराची शक्यता अधिक असते. यंदा प्रथमच मोठ्या प्रमाणावर मगरीच्या पिल्लांचा वावर आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागासाठी ही एक नवीन जबाबदारी आणि आव्हान ठरत आहे, तर गावकऱ्यांनी तातडीने उपाययोजनांची मागणी केली आहे…