अनोख्या रंगसंगतीचे गुपित: खांदाडच्या चिमण्यांनी घेतले पिवळे रूप…

0
6

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील) :-  

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील खांदाड गावात अलीकडेच पिवळ्या रंगाच्या चिमण्यांचे दुर्मीळ दर्शन झाले असून, त्यामुळे ग्रामस्थ व पक्षीप्रेमींमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे. नेहमीच्या चिमण्यांसोबत खाद्य शोधताना दिसलेल्या या तेजस्वी पिवळ्या रंगाच्या चिमण्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.

या चिमण्यांचे डोके, मान आणि चेहरा तजेलदार पिवळ्या रंगाचा असून, शरीराचा इतर भाग मात्र नेहमीच्या चिमण्यांसारखा तपकिरी रंगाचा दिसतो. हे दृश्य विशेषतः चिमण्या एकत्र बसून धान्य टिपताना आढळले. त्याचबरोबर, गत महिन्यातील २२ मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे गावाजवळील मोठ्या तलावाचे पाणी हिरवट-पिवळसर झाले असून, तलावातील बेडूकही पिवळसर रंगाचे दिसून आले.

या अद्भुत निसर्गदृश्यामुळे ग्रामस्थांना निसर्गाच्या अनोख्या रंगछटा अनुभवण्याची संधी मिळत आहे. काही वर्षांपूर्वीही मे-जून दरम्यान येथे स्थलांतरित चिमण्यांची मोठ्या संख्येने हजेरी असायची आणि सकाळ-संध्याकाळ त्यांचा किलबिलाट सर्वत्र घुमायचा, अशी आठवण एका ज्येष्ठ ग्रामस्थ महिलेने सांगितली.

त्या म्हणाल्या, “यावर्षी दिसलेल्या पिवळ्या चिमण्या कदाचित स्थलांतरित असाव्यात. हा निसर्गाचा अद्भुत चमत्कार असल्यामुळे प्रत्येकजण आनंदित आहे.”या दुर्मीळ दृश्यामुळे खांदाड गावाचा निसर्गसंपन्न परिसर पुन्हा एकदा चर्चेत आला असून, हे अद्भुत बदल पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.