अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
अलिबाग येथील कोर्लई समुद्र किनाऱ्यापासून सुमारे दोन नॉटिकल मैल अंतरावर अरबी समुद्रात एक संशयित बोट आढळल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही बोट पाकिस्तानची असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी वर्तवला असून, बोटीवरील मार्किंग पाकिस्तानी असल्याचे संकेत देत आहेत.
ही बोट भारतीय रडारच्या टप्प्यात आल्यावर सुरक्षा यंत्रणांना तिचा संशय आला. घटनेची माहिती मिळताच कोस्ट गार्ड, नौदल, बॉम्ब निकामी पथक, QRT फोर्स, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सीमा शुल्क व स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
वादळी वारे आणि जोरदार पावसामुळे बोटीपर्यंत थेट पोहोचण्यात अडथळे येत आहेत. त्यामुळे तटरक्षक दल आणि नौदलाकडून सर्च ऑपरेशनसाठी विशेष बोटी आणि उपकरणांची तयारी सुरू आहे.
दरम्यान, रायगड जिल्ह्यातील संपूर्ण किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, स्थानिक यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्च ऑपरेशनसाठी व्यापक योजना आखण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, जेएसडब्ल्यू कंपनीच्या बार्जच्या माध्यमातून संशयित बोटीपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरु आहे.
या बोटीमागे दहशतवादी कारवाया किंवा गुप्त हालचाली असल्याची शक्यता नाकारता येत नसल्यामुळे तपास अत्यंत गंभीरपणे घेतला जात आहे. नागरिकांनी शांतता राखत कुठलीही संशयास्पद गोष्ट दिसल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.