उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण शहरात बेशिस्त रिक्षा वाहतूक, अनधिकृत पार्किंग, आणि रस्त्यावरील अतिक्रमण यामुळे दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या गोंधळामुळे पादचारी ,शालेय विद्यार्थ्यांपासून ते सर्वसामान्य नागरिकांपर्यंत सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शहरातील आठ शाळांचे एकाच वेळेस सुटण्यामुळे मोठी वाहतूक वाढते. त्याचवेळी अवजड वाहने शहरातून मार्गक्रमण करत असतात. याशिवाय काही रिक्षाचालक बेसावधपणे ओव्हरटेक करत, वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करतात. रिक्षा स्टँडवर क्षमतेपेक्षा जास्त रिक्षा उभ्या राहत असल्यामुळे रस्त्यांचे अरुंदीकरण होते. राजपाल नाका ते कोटनाका पर्यत बेशिस्त पणे रिक्षा स्टँड उभे राहिले आहेत.
शहरात दोन्ही बाजूंनी बेकायदेशीर पार्किंग आणि परप्रांतीय फळ-भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्यांनी रस्त्यावर अडथळा निर्माण केला आहे. पादचाऱ्यांसाठी असलेल्या फुटपाथवर व्यापाऱ्यांनी दुकान समोर प्लॅस्टिकचे पॅलेट टाकून रस्त्या आणि फुटपाथ वर अतिक्रमण केल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरूनच चालावे लागते. वैष्णवी हॉटेल समोरील उंचवटाही वाहतुकीस अडथळा ठरते. या प्रश्नांमुळे दररोज शाळकरी विद्यार्थी, पालक आणि नागरिक हैराण झाले असून, वाहतूक कोंडीचा कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, उरण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून बिल्डर आणि ठेकेदारांच्या कामांकडेच लक्ष केंद्रीत केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.तर वाहतूक विभाग आपल्या वसुलीत मग्न आहेत. या संदर्भात उरण नगरपालिकेतील मुख्यधिकारी आणि वाहतूक पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.