न्यू इंग्लिश स्कूल नांदगावमध्ये कारगिल विजय दिनाचे भव्य आयोजन… शहिदांना सश्रद्ध मानवंदना, विद्यार्थिनींच्या राख्यांनी भरले देशप्रेम…

0
16

नांदगाव शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-

देशासाठी हसत-हसत बलिदान देणाऱ्या शूरवीरांना साक्षात मानवंदनेचा नजराणा!मराठा विद्या प्रसारक समाज संचलित न्यू इंग्लिश स्कूल,नांदगाव येथे कारगिल विजय दिन मोठ्या उत्साहात आणि देशभक्तीच्या ज्वाळेत साजरा करण्यात आला.

कार्यक्रमात मुख्याध्यापिका ज्योती काळे आणि पर्यवेक्षक अविनाश शेवाळे यांच्या हस्ते शहीद स्मारकास पुष्पचक्र अर्पण करून वीरांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी व शेकडो विद्यार्थी राष्ट्रभक्तीच्या भावनेने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते इयत्ता दहावीच्या स्काऊट-गाईड विद्यार्थ्यांनी केलेले शिस्तबद्ध संचालन आणि विद्यार्थिनींनी रक्षाबंधनानिमित्त सीमारेषेवर तैनात जवानांसाठी पाठवलेल्या देशप्रेमाने भारलेल्या राख्या ज्यातून त्यांचा साक्षात अभिमान व्यक्त झाला.

यावेळी वरिष्ठ शिक्षक अशोक मार्कंड यांनी कारगिल युद्धाची पार्श्वभूमी उलगडताना विद्यार्थ्यांना सांगितले,मे १९९९ मध्ये सुरू झालेल्या या युद्धात भारतीय सैन्याने ‘ऑपरेशन विजय’ राबवत पाकिस्तानी घुसखोरांना त्यांच्या सीमेत हुसकावून लावले. सुमारे २ लाख भारतीय सैनिक या मोहीमेचा भाग होते.हवाई दलाच्या अचूक हल्ल्यांमुळे आणि बोफोर्स तोफांच्या माऱ्यामुळे शत्रूचे मनोबल खचले.शेवटी २६ जुलै १९९९ रोजी भारताने आपली भूमी पुन्हा मिळवून अभूतपूर्व विजय मिळवला.”

कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले,देशाच्या सुरक्षेसाठी झगडणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता बाळगणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे.त्यांच्या त्यागामुळेच आपण आज सुरक्षित आहोत.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले…