कशेणे गावाच्या दारात बिबट्या! — सीसीटीव्हीचा थरार आणि वनविभागाची धावपळ… संध्याकाळी वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांची आपत्कालीन बैठक — जनजागृती व सुरक्षिततेसंदर्भात मार्गदर्शन होणार…

0
27

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील कशेणे गावात काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या फिरत असल्याचे सीसीटीव्हीमध्ये स्पष्टपणे आढळून आले असून सदर व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेची माहिती गावच्या सरपंचांनी तत्काळ वनविभागाला दिली असून वनअधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाची त्वरित टीम घटनास्थळी दाखल झाली आहे व परिसरात गस्त सुरू केली आहे. शिंदे यांनी सांगितले की तीन दिवसांपूर्वी बिबट्या दिसल्याचा तोंडी अहवाल प्राप्त झाला होता, मात्र आता व्हिडीओ पुरावा मिळाल्यामुळे विभागाकडून अधिक गांभीर्याने कारवाई केली जात आहे.

याआधी गावातील युवक कुणाल गावंड याने आपल्या गावात पाळीव कुत्र्याला बिबट्याने गावाच्या बाहेरून ओढून नेल्याचे सांगितले होते व त्यावेळी केवळ अर्धा उरलेला कॉलर चेन पुरावा होता. सध्याच्या व्हिडीओद्वारे बिबट्याच्या उपस्थितीची पुष्टी झाल्यामुळे वनविभाग अधिक जागरूक झाला असून परिसरात चौोवीस तास गस्त घालण्यात येत आहे. “बिबट्याच्या हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात असून, जनतेची आणि वन्य प्राण्याची दोघांचीही सुरक्षितता महत्त्वाची आहे,” असे शिंदे यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर, गावातील घनदाट जंगलाशेजारील मंदिरात आज सायंकाळी उशिरा ३० जुलै २०२५ रोजी एक आपत्कालीन जनजागृती बैठक आयोजित करण्यात आली असून या बैठकीत गावकऱ्यांना दक्षता उपाय, काय करावे व काय टाळावे, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे व स्वसंरक्षणाचे उपाय, पाळीव जनावरांचे रक्षण, तसेच लहान मुले, वृद्ध, आजारी आणि अपंग व्यक्तींना विशेष काळजी घेण्याच्या सूचना दिल्या जातील. वनविभागाने हेही नमूद केले आहे की बिबट्या हा संरक्षित वन्यप्राणी आहे व “माणसांचे व प्राण्यांचे रक्षण हे जसे महत्त्वाचे आहे, तसेच या वन्यजीवाचे संरक्षण व संवर्धन हेही तितकेच आवश्यक आहे,” असेही श्री. शिंदे यांनी शेवटी नमूद केले.