पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर जीवघेणा भ्याड हल्ला… कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल….

0
4

नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके) :- 

कर्जत तालुक्यातील युवा पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या प्राणघातक हल्ल्याने संपूर्ण पत्रकारिता क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे. हा हल्ला केवळ एका पत्रकारावर नसून तो लोकशाही व्यवस्थेवरच केलेला हल्ला असल्याची तीव्र भावना तालुक्यातील सर्व पत्रकारांनी व्यक्त केली आहे.
दि.१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. पत्रकार प्रथमेश कुडेकर आणि त्यांचे मित्र मयूर रणदिवे हे नेहमीप्रमाणे चार फाटा येथील ठाकरे उपहारगृह येथे चहा पिण्यास गेले होते.परतताना,कृषी विद्यापीठाच्या जुन्या प्रवेशद्वारासमोर एकाने हात करून त्यांना थांबवले…वाटले की, कोणी पत्ता विचारतोय, म्हणून ते थांबले. मात्र काही कळायच्या आतच चार-पाच अज्ञातांनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला.
हल्लेखोरांनी हातात फायटर, लोखंडी पाईप व धारदार शस्त्रे घेऊन कुडेकर आणि त्यांच्या मित्रावर हल्ला केला.या भीषण हल्ल्यात कुडेकर व त्यांच्या मित्राला गंभीर दुखापत झाली. मित्राने धाडसाने मधे पडून कुडेकर यांचे प्राण वाचवले. काही वेळातच घटनास्थळी जमाव जमा झाल्याने हल्लेखोरांनी सिल्व्हर रंगाच्या वॅगनर गाडीतून पलायन केले.
या घटनेनंतर पत्रकार क्षेत्रात संतापाचा उद्रेक झाला. कर्जत प्रेस असोसिएशनच्या सदस्यांसह ॲड. कैलास मोरे (कायदेशीर सल्लागार), कोंढाणा टाइम्सचे संपादक रमाकांत जाधव, धर्मेंद्र मोरे, लोकेश यादव, सतीश देशपांडे, माजी नगरसेवक ॲड. संकेत भासे यांच्यासह अनेकांनी कर्जत पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदिप भोसले यांची भेट घेतली व गुन्हा क्रमांक 199/2025 प्रमाणे भारतीय न्याय संहिता कलम 118 (1) 115 (2) 3 (5) अशी नोंद कर्जत पोलीस ठाण्यात घेण्यात आली..
या भेटीत त्यांनी हल्लेखोरांचा लवकरात लवकर तपास करून कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली. यावेळी पत्रकारांनी एकमुखाने हल्ल्याचा निषेध केला व पोलिसांना कारवाई करण्यास सांगितले. त्यांच्या पाठपुराव्यामुळे कर्जत पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केली आहेत पोलीस उपनिरीक्षक किरण नवले करीत आहेत.पत्रकार सुरक्षा कायदा अंमलात यावा, हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी, आणि प्रकरण गंभीरतेने घेण्यात यावे, अशी मागणी तालुक्यातील पत्रकारांकडून केली जात आहे.