कालवा रोडवरील नागरिकांना मिळाली हक्काची घरे… कालवा वासियांच्या 40 वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम… 

0
1

रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):- 

रोहा नगरपरिषदेच्या हद्दीतील कालवा रोडवरील रहिवाशांना अखेर हक्काची घरे मिळाली असून, गेली 40 वर्षे सुरू असलेला वनवास संपला आहे. नगरसेवक समीर भाई सपकाळ यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळाले असून,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते घरांचे अधिकृत पत्र वाटप करण्यात आले.
सदर प्रकरणात खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे व अनिकेत भाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कालवा परिसरातील 17 घरे ही अनेक वर्षांपासून अनधिकृत होती. त्यामुळे रहिवाशांना हक्काचे कोणतेही कागदपत्र मिळत नव्हते. ही बाब समीर भाई सपकाळ यांच्या लक्षात येताच त्यांनी नागरिकांना एकत्र करून शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू केला.
या पाठपुराव्याला यश येऊन कालवा परिसरातील सर्व 17 घरे अधिकृत घोषित करण्यात आली. भव्य कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते घरमालकांना अधिकृत कागदपत्रांचे वितरण करण्यात आले.
या आनंदाच्या क्षणी कालवा रहिवाशांनी समीर सपकाळ यांच्या निवासस्थानी जाऊन पेढे भरवून आभार मानले. काहींना गहिवरून अश्रू अनावर झाले. “गेल्या 40 वर्षांपासून आम्ही घरात राहत होतो, पण हक्क नव्हता. आज ती घरे आमची झाली, याचे संपूर्ण श्रेय समीर सपकाळ यांना जाते,”अशी भावना रहिवाशांनी व्यक्त केली.या उपक्रमात माजी नगराध्यक्ष संतोष पोटफोडे व नगरसेविका शिल्पाताई धोत्रे यांचेही मोलाचे योगदान असल्याचे कालवा रहिवाशांनी नमूद केले.