अलिबाग शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन):-
अंगावर थुकला का?या प्रश्नावरून सुरू झालेल्या वादातून एका युवकाला दोन सख्ख्या मेहुण्यासह इतर पाच नातेवाईकांनी जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना रेवदंडा येथील कोकण एज्युकेशन सोसायटीसमोर घडली.या प्रकरणी रेवदंडा पोलिस ठाण्यात सात जणांविरोधात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी अभिषेक मनोज कदम (वय ३५,रा.थेरोंडा,ता.अलिबाग) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, औदुंबर शरद गोंधळी याच्याशी त्याचे प्रेमसंबंध होते आणि मे २०२४ मध्ये औदुंबरच्या बहिणीशी प्रेमविवाह केला होता.हा विवाह गोंधळी कुटुंबाला मान्य नव्हता, यामुळे ते संतप्त होते.१ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी साडेचार वाजता अभिषेक कदम रेवदंडा येथे एका मोबाईल शॉपीमध्ये पैसे देण्यासाठी जात असताना,के.ई.एस. हायस्कूलसमोर अर्जुन कुमार तांबडकरने त्याच्या अंगावर थुंकले. “तू अंगावर का थुंकलास?” असे विचारताच वादाला तोंड फुटले आणि अर्जनकुमारने इतर नातेवाईकांना फोन करून बोलावले. औदुंबर शरद गोंधळी याने अभिषेकच्या गाडीसमोर आपली गाडी आडवी लावून त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला.अभिषेकने पळून मंदिराच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला असता,ओमकार तांबडकर,प्रमोद म्हात्रे,अनिकेत सावंत, जयेश व जयवंत शेणवईकर आदी सातजणांनी मिळून त्याला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली. रूद्राक्षाची माळ फाडली, टीशर्ट फाडला, लोखंडी रॉडने पाठीवर व डोक्यावर जबर मार दिला आणि “गाडी खाली घालून ठार मारून टाकीन” अशी धमकी दिली.या घटनेनंतर अभिषेक कदम याला अलिबागच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. उपचारामुळे तक्रार नोंदवण्यात उशीर झाला. या प्रकरणी भारतीय न्यायसंहिता कलम १८९(२), १९१(२), १९०(१२), ६(२), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.रेवदंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी औदुंबर गोंधळी, प्रमोद म्हात्रे आणि अनिकेत सावंत यांच्यावर यापूर्वीही हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत.