नेरळ शिवसत्ता टाइम्स (संदेश साळुंके):-
खालापूर तालुक्यातील कांद्रोली गावात रहिवासी असलेले जितेंद्र जनार्धन पलांडे हे दिनांक २५ जुलै २०२५ रोजी दुपारी १:१० वाजता स्वतःची होंडा शाहीन मोटरसायकल घेऊन आजारी असल्यामुळे घोडीवली तर्फे कांद्रोली येथील घरातून रुग्णालयात जाण्यासाठी निघाले. मात्र, ते त्या दिवसानंतर घरी परतले नाहीत.
त्यांचा मुलगा वेदांत पलांडे यांनी वडिलांचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर त्याच दिवशी रात्री ११:३८ वाजता खालापूर पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. दुसऱ्या दिवशी, घरापासून सुमारे १०० मीटर अंतरावर असलेल्या नाल्यात सकाळी ११ वाजता जितेंद्र यांची मोटरसायकल आढळून आली.
कुटुंबीयांनी तात्काळ एनडीआरएफ टीम बोलावून शोधमोहीम राबवली, मात्र तरीही जितेंद्र यांचा काहीच ठावठिकाणा लागलेला नाही. विशेष म्हणजे, पोलीस यंत्रणेकडून कोणतीही सक्रिय शोधमोहीम हाती घेतलेली नाही, तसेच नातेवाईकांनाही योग्य माहिती दिली जात नसल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे.यामुळे कुटुंबीयांत तीव्र नाराजी असून, शोधमोहीम अधिक जलद आणि प्रभावीपणे राबवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. जितेंद्र पलांडे यांच्या पश्चात पत्नी तृप्ती, ७५ वर्षीय आई आणि दोन मुलं असा परिवार आहे.