रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत) :-
अलिबाग तालुक्यातील नागावमध्ये दिवसेंदिवस लोकप्रिय होत असलेल्या अनोख्या व भव्य हातावरच्या नारळ फोडी व गडगडी नारळ स्पर्धेला स्पर्धक व रसिक प्रेक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला…. डॉ. सचिन शरद राऊळ व राकेश अनंत राणे मित्रमंडळाने नागाव समुद्र किनाऱ्यालगत भरविलेल्या या स्पर्धेत रायगडसह मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, गोवा व कोकणातील असंख्य स्पर्धक सहभागी झाले होते…. नारळ फोडी स्पर्धेत 48 व गडगडी नारळ स्पर्धेत 24 स्पर्धकांनी सहभाग घेऊन स्पर्धेची शोभा वाढवली…. अत्यंत अटीतटीच्या व रंगतदार अशा नारळ फोडी स्पर्धेत संजय घरत , सतीश आचरेकर यांनी अंतिम विजेतेपद पटकावून आकर्षक चषक व रोख पारितोषिक पटकावले… तर गडगडी नारळ स्पर्धेत ग्रंथ नाखवाने प्रथम क्रमांक पटकाविला…. स्पर्धेतील इतर उपविजेत्यांना देखील आकर्षक चषक व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले…. नारळी पौर्णिमेच्या अगोदर खेळला जाणारा हा कोकणातील लोकप्रिय सण आहे. इथल्या नारळी पोफळीच्या बागा, नारळ हा आमच्या जीवनातील अविभाज्य व व्यवसायाचा भाग आहे… नारळ फोडी पूर्वापार चाललेला खेळ आहे… येत्या काळात हा खेळ अधिक लोकप्रिय होऊन सर्वदूर पोहचतोय… पुढील वर्षी या स्पर्धा डे नाईट स्वरूपात घेणार असून या स्पर्धेत महिलांना देखील संधी देण्याचा आमचा मानस आहे…. नारळ फोडी स्पर्धेला ऑलम्पिक मध्ये समाविष्ट केल्यास कोकणकर या स्पर्धेत नक्कीच बाजी मारतील, असा विश्वास डॉ. सचिन राऊळ यांनी व्यक्त केला… यावेळी सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील याने छ. शिवाजी महाराजांवर अप्रतिम गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली… या स्पर्धेला प्रोत्साहन देण्यासाठी आमदार महेंद्र दळवी, भाजप महिला मोर्चा रायगड जिल्हाध्यक्षा चित्राताई पाटील, अॕड. आस्वाद पाटील, सवाई पाटील, व अन्य मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते… स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी डॉ. सचिन राऊळ व राकेश राणे मित्रमंडळाने अविरत मेहनत घेतली….