“तरुणांचा आवाज दाबला जाणार नाही, शेकाप पाठीशी उभा आहे!”

0
7

रायगड शिवसत्ता टाइम्स (अमुलकुमार जैन) :-

लाखो युवकांना “लाडका भाऊ योजना” अंतर्गत शासनाने रोजगाराची आशा दाखवली….  “तुम्हाला प्रशिक्षण देतो आणि पुढे प्रशासकीय सेवेत सामावून घेतो,” असा स्पष्ट शब्दांत विश्वास दिला गेला… युवकांनी नोकरीच्या वायदेशी स्वप्नांना फाटा देऊन, कमी मानधनातही मोठ्या जिद्दीने, निष्ठेने शासकीय यंत्रणेचा भाग म्हणून काम केलं….
मात्र आज हेच युवक शासनाकडून दुरावा, दुर्लक्ष आणि धोका अनुभवत आहेत…. शासनाने सांगितलं होतं “निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी तुम्हाला संधी दिली जाईल.” पण आज वास्तव काय?निवृत्त कर्मचाऱ्यांनाच पेन्शनसह पुन्हा अर्ध्या पगारावर नेमलं जातंय! आणि जी पदे वर्षानुवर्षं रिक्त आहेत, तिथे ट्रेनिंग पूर्ण केलेल्या, अनुभवी, पात्र युवकांना स्थानच दिले जात नाही…. ही सरळसरळ फसवणूक नाही का? युवकांना दिलेलं ट्रेनिंग, त्यासाठीचं सर्टिफिकेट, ते आज कुठेच उपयुक्त नाही, वैध मानलं जात नाही, मग हा सर्व खर्च, वेळ, आशा… ह्या सगळ्याचं काय? हे युवक आता वयोमर्यादेच्या उंबरठ्यावर पोहोचत आहेत, त्यांच्या आयुष्याचा महत्त्वाचा काळ तुम्ही वापरून घेतलात, आणि आता ‘घरी बसा’ म्हणताय? 1 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांचा मोर्चा आणि तुकाराम बाबा महाराज यांचे आमरण उपोषण सांगली येथे आयोजित करण्यात आले होते…. मी स्वतः त्या आंदोलनात सहभागी झालो….  तिथे असंख्य युवकांच्या व्यथा मी प्रत्यक्ष ऐकल्या… विश्वासघाताचे व्रण त्यांच्या मनावर कोरले गेले आहेत…. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या अनेक युवकांना आशेचा दीप तेवता तेवता विझलेला दिसतो आहे…. रोजगाराचा विषय हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो लाखो घरांमधल्या स्वप्नांचा, अस्तित्वाचा आणि भविष्याचा प्रश्न आहे… युवकांच्या मतांनी सत्तेवर आलेले प्रतिनिधी आता त्यांच्या प्रश्नांवर गप्प का आहेत? या सगळ्या पार्श्वभूमीवर, शेतकरी कामगार पक्ष युवकांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे… आम्ही केवळ भावनात्मक पाठिंबा देत नाही, तर या प्रश्नावर संघटित आवाज उठवत आहोत…. युवकांच्या न्यायहक्कासाठी शेकाप लढा देईल… रस्त्यावर, सभागृहात आणि विधानमंडळात हा लढा संपलेला नाही, तो आता खऱ्या अर्थाने सुरू होतोय…. मी, अलिबाग तालुक्यातील युवक संघटनेचा अध्यक्ष म्हणून, युवकांच्या प्रत्येक वेदनेला शब्द देईन, प्रत्येक मागणीसाठी आवाज उठवीन आणि शेकापच्या प्रत्येक कार्यकर्त्यासोबत, हा संघर्ष अखेरपर्यंत नेईन, असे विक्रम वार्डे यांनी सांगितले…