नाशिक शिवसत्ता टाइम्स (अनिल धामणे):-
सीमेवरील जवानांसाठी दरवर्षी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठविणाऱ्या “एक राखी सैनिकांसाठी” या उपक्रमाचे आयोजन यंदाही सकल मराठा परिवार नाशिक यांच्या वतीने उत्साहात करण्यात आले. अभिनव बाल विकास मंदिर मखमलाबाद, जनता विद्यालय गांधीनगर, मनपा शाळा क्र.४९ पंचक आणि जनता विद्यालय पंचक या ठिकाणी विद्यार्थ्यांच्या आणि महिला शिक्षिकांच्या सहभागातून हा उपक्रम राबविण्यात आला.
गेल्या चार वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमांतर्गत यंदा २० ठिकाणी प्रातिनिधिक स्वरूपात राख्या, ग्रीटिंग आणि संदेश कार्ड्स सीमारेषेवर तैनात असलेल्या सैनिकांना पाठविण्यात येत आहेत. इ. १ ली ते १० वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी, तसेच महिला वर्गाने स्वतः हाताने सुंदर राख्या व ग्रीटिंग कार्ड तयार करून त्यावर “सैनिकहो, तुमच्यासाठी…” अशा देशभक्तिपर घोषवाक्यांद्वारे आपुलकी व्यक्त केली.
समन्वयक खंडू आहेर यांनी सांगितले की, “आपण सैनिकांपर्यंत पोहोचू शकत नाही… मात्र राखी व कार्ड पाठवून त्यांच्या सणाचा आनंद द्विगुणीत करण्याचा प्रयत्न करतो.” राखी मिळाल्यानंतर अनेकदा बटालियनकडून आभार पत्र येत असून सैनिक बांधव भावनिक प्रतिक्रिया देतात…
या उपक्रमात मुख्याध्यापक प्रमोद ठाकरे, विवेक पवार, वैशाली उखिर्डे, गोपाल बैरागी आदींचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमावेळी चैताली आहेर, स्नेहल काळे, सिंधुताई पगार, अपूर्वा पाटील, छाया फलाने, प्रकाश बोराडे, संजय गोरडे आदींसह संपूर्ण सकल मराठा परिवार कार्यरत होता… राष्ट्रसेवेतील सैनिकांना राखीच्या माध्यमातून मानाचा मुजरा करणारा हा उपक्रम समाजासाठी स्मरणीय असा ठरला आहे…