मुंबई शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
३० जुलै २०२५ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नव्या कार्यकारिणीची घोषणा आज टिळक भवन, मुंबई येथे करण्यात आली. नव्या कार्यकारिणीत पक्षाने नव्या चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणात संधी देत सामाजिक आणि भौगोलिक समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली.
या नव्या कार्यकारिणीत एकूण ६६ टक्के पदाधिकाऱ्यांना प्रथमच संधी देण्यात आली असून, उर्वरित ३३ टक्के पदे ज्येष्ठ व अनुभवी नेत्यांकडे सोपवण्यात आली आहेत. यामुळे अनुभव व ऊर्जा यांचा योग्य समन्वय साधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
पक्षाने सामाजिक न्यायाचा विचार करत ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती आणि महिलांना देखील लक्षणीय प्रतिनिधित्व दिले आहे. एकूण पदाधिकाऱ्यांपैकी ४१ टक्के प्रतिनिधी ओबीसी समुदायातून, १९ टक्के एससी-एसटी समाजातून तर ३३ महिलांना कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले की, “ही कार्यकारिणी म्हणजे केवळ नेतृत्व परिवर्तन नाही तर समावेशकतेच्या दिशेने काँग्रेसचा सकारात्मक टप्पा आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र घेऊनच काँग्रेस पुढे जाईल.”
प्रदेश कार्यकारिणीत राज्यातील सर्व भागांतून प्रतिनिधित्व मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, भौगोलिक समतोल राखण्यावरही भर देण्यात आला आहे. कोकण, मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्र या सर्व विभागांतून कार्यकर्त्यांना संधी देण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यालाही कार्यकारिणीत योग्य प्रतिनिधित्व मिळाले असून, जिल्ह्यातून काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. श्रद्धा ठाकूर सरचिटणीसपदी मिलिंद पाडगावकर यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच नंदा म्हात्रे यांना सरचिटणीस, श्रुती म्हात्रे यांना सचिव, आर. सी. घरत यांना कार्यकारी सदस्य तर यांना देखील कार्यकारिणीत स्थान देण्यात आले आहे.
या नव्या नियुक्त्यांमुळे रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळात संघटन बळकट करण्यासाठी नवनियुक्त पदाधिकारी कामाला लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ही कार्यकारिणी आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेससाठी नवे नेतृत्व तयार करण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण मानली जात आहे. नव्या नेतृत्वाच्या जोरावर काँग्रेस राज्यात आपले स्थान पुन्हा मजबूत करेल, असा विश्वासही पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे.