रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा नगरपालिकेच्या हद्दीतील अष्टमी येथे उभारण्यात आलेल्या स्वर्गीय दत्ताजीराव तटकरे रक्तपेढीमध्ये रुग्णांना एका रक्ताच्या बॅगसाठी तब्बल १,५५० रुपये आकारले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. रक्तदात्याने नि:स्वार्थ भावनेतून रक्तदान करूनही त्याच रुग्णाला मोफत रक्त न मिळणे, हा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे… खासदार सुनीलजी तटकरे आणि मंत्री आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून रोहा नगरपालिका हद्दीत ही ब्लड बँक उभारण्यात आली असून तिचे संचालन अर्पण संस्था करत आहे.शासनाने कोट्यवधी रुपये खर्चून इमारत उभी केली असली,तरी रुग्णांना विनामूल्य रक्त उपलब्ध करून देण्याऐवजी शुल्क आकारले जात असल्याचा आरोप उभाटा ठाकरे गटाचे राजेश काफरे यांनी केला आहे.“जर नागरिकांकडून एवढी रक्कम आकारायचीच असेल, तर शासकीय रुग्णालयात स्टोरेज सेंटर उभारले असते तरी पुरे झाले असते…एवढा गाजावाजा करून रक्तपेढी उभारण्याचा उद्देश काय?असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला… स्थानिक नागरिकांच्या मते,अपघातग्रस्त किंवा गंभीर आजारी रुग्णांना तातडीने मोफत रक्त मिळावे, हीच ब्लड बँक स्थापनेची खरी भावना होती.मात्र सध्या सुरू असलेली शुल्क आकारणी ही त्या भावनेला हरताळ फासणारी ठरत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे…