महाड शिवसत्ता टाइम्स (निलेश लोखंडे):-
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका कायम असताना मंगळवार दि. १२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लाख पाले गावाजवळ झालेल्या अपघातात वैद्यकीय महिला अधिकारी जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली.महाडकडून मुंबईकडे जात असलेल्या MH-43-Y-6056 क्रमांकाच्या मालवाहतूक ट्रकला, पुण्याकडे निघालेली MH-14-MC-9859 क्रमांकाची व्हॅगनार कार पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात कारमधील डॉक्टर पल्लवी पळशीकर (वय ३५, रा. लातूर) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन आणि मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.त्यांच्यासोबत असलेले डॉक्टर विशाल रमेश बडे (वय ३०, रा. अनपटवाडी पारगाव, ता. पाटोदा, जि. बीड) हे जखमी झाले असून, त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच महामार्ग वाहतूक शाखा,महाडचे पोलिस घटनास्थळी धावून गेले आणि जखमी डॉक्टर बडे यांना रुग्णालयात हलविण्याची मदत केली.