पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी… राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा टोला…

0
76

रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशिल सावंत):-

रायगड जिल्ह्यात महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार गट व शिंदे शिवसेनेत पालकमंत्री पदाचा वाद शिगेला पोहचलाय. शिवसेनेकडून मंत्री भरत गोगावले तर राष्ट्रवादीकडून मंत्री आदिती तटकरे रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा करतात. यातच काही केल्या रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटताना दिसत नाही. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे रायगड जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी सुनिल तटकरे यांच्यावर निशाणा साधलाय. लोकसभा व विधान सभा निवडणुकीत गोगावले व तटकरे हे एकत्र होते, जनतेला विकासाबाबत आश्वाशीत करीत होते. आता मात्र पालकमंत्री पदावरून रायगडात रेड्याची झोंबी सुरू आहे, असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लगावला. तटकरे ज्याला ज्याला जवळ करतात त्याच्यावर ते कुरघोडी करतात असा आरोप चव्हाण यांनी केलाय.