गोद नदीचा कहर : खांदाड वाडी वेढली, जीवघेणा थरार सुरू… नगरपरिषद, पोलीस आणि रेस्क्यू टीमची धाडसी सुटका मोहीम…

0
10

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

माणगाव तालुक्यात सोमवारी संध्याकाळी गोद नदीला आलेल्या पुरामुळे खांदाड आदिवासी वाडी पाण्याने वेढली गेली… सुरुवातीला ग्रामस्थ गाव सोडायला तयार नव्हते… पण जसजसे पाणी छाती-मान उंचीपर्यंत आले, तसतसे भीतीने सर्वजण घराबाहेर पडू लागले!

यावेळी माणगाव नगरपरिषद अधिकारी, पोलीस व कोलाड रेस्क्यू टीमने धाडसी बचावमोहीम सुरू केली. गावातील तरुणांसह त्यांनी लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना उचलून सुरक्षित स्थळी पोहोचवले. आणि बघता बघता १६ कुटुंबांतील तब्बल १०५ ग्रामस्थांची थरारक सुटका करण्यात आली.
मध्यरात्री अजून सहा कुटुंबे आणि दोन दिव्यांग पाण्यात अडकले होते. काळीज गोठवणाऱ्या परिस्थितीत कोलाड रेस्क्यू टीमने बोटी उतरवल्या… जीव धोक्यात घालून त्यांनी सर्वांना बाहेर काढले… आणि अखेरीस एकाही जीवाला हानी होऊ दिली नाही.

बचावलेल्यांना नगरपरिषदेकडून तात्पुरत्या निवाऱ्यात हलवण्यात आले. तिथे गाद्या, चादरी, डासमुक्त सोय, गरम दूध, चहा, जेवण, उपवास करणाऱ्यांसाठी वेगळा आहार… दुसऱ्या दिवशी आंघोळीची सोय, नाश्ता – सर्व काही अगदी व्यवस्थित!

नगरपरिषद कर्मचारी रात्रभर जागून काम करत राहिले, आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा निवाऱ्यांवर पोहोचून ग्रामस्थांची काळजी घेतली. ही धाडसी मोहिम माणगाव नगर परिषद, कोलाड रेस्क्यू टीम आणि स्थानिक तरुणांचे सेवेचे आदर्श उदाहरण ठरली आहे!