रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा खारी रोडवर सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) केलेल्या कारवाईमुळे टपरीधारक महिला व लहान हॉटेल व्यवसायिक अक्षरशः रस्त्यावर आले आहेत. ऐन सणासुदीच्या काळात उचलण्यात आलेल्या या टपऱ्यांमुळे स्थानिकांवर उपासमारीची वेळ ओढवली असून, या कारवाईविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ही संपूर्ण घटना मंत्री अदिती तटकरे यांच्या मतदारसंघात घडली असून, स्थानिकांच्या मते “लाडक्या बहिणी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदारांनी टपरीधारकांसाठी काहीही मदत केली नाही. “एक महिला मंत्री असूनही, महिलांच्या उदरनिर्वाहावर कुणीच मदतीचा हात दिला नाही”, अशी खंत स्थानिक महिलांनी व्यक्त केली आहे.सदर कारवाईवर सामाजिक कार्यकर्ते आशिष स्वामी यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत, प्रश्न उपस्थित केला की:कोलाड ते रोहा महामार्गावर अनेक ठिकाणी मोठमोठी अतिक्रमणे आहेत, तिथे कारवाई का नाही? फक्त गरीब टपरीधारक महिलांवरच का कारवाई?”तसेच, युवा आमदार अनिकेत तटकरे यांनी टपरीधारकांच्या मदतीसाठी साधा फोन उचलला नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया टपरीधारकांनी दिली आहे.सदर कारवाईनंतर एका महिला टपरीधारकांनी अश्रू अनावर होऊन सांगितले:आमचं उदरनिर्वाहाचं साधन हिरावलं… जगून तरी काय फायदा? सणासुदीच्या दिवसात मुलांना खायला द्यायला काही नाही!” सदर कारवाईच्या मागे जाणूनबुजून राजकीय दबाव असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. “कोणाच्यातरी मर्जी सांभाळण्यासाठी हा निर्णय घेतला गेला”, असे आरोप नागरिक करत आहेत. या प्रकारामुळे मंत्री अदिती तटकरे व युवा आमदार अनिकेत तटकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.स्थानिकांनी प्रशासनाकडे तातडीने पुनर्विचार करून टपरीधारकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.