माणगाव व्यापारी संघटनेकडून मंत्री भरतशेठ गोगावले यांचा भव्य सत्कार

0
4

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-

माणगाव व्यापारी संघटना या प्रतिष्ठित संघटनेच्या वतीने नुकताच मंत्री भरतशेठ गोगावले यांचा माणगाव शहरातील निजामपूर रोडवरील गांधी मेमोरियल हॉलमध्ये भव्य सत्कार करण्यात आला. गोगावले हे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने माणगावात आले असता, व्यापारी संघटनेने त्यांचे स्वागत करून सन्मान करण्याचा मान मिळवला.
माणगाव व्यापारी संघटना ही रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत मानाची संघटना आहे. तिची स्थापना एक दशक पूर्वी यशस्वी व्यावसायिक व संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण (बाळा) दलवी यांनी केली होती. स्थापनेपासूनच या संघटनेने व्यापारी वर्गाच्या प्रगतीसाठी, सामाजिक सलोखा वाढवण्यासाठी आणि व्यवसायातील अडचणी सोडवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली आहे.

संघटनेचे कार्याध्यक्ष तथा संस्थापक उपाध्यक्ष रमेश जैन आणि सामाजिक कार्य विभागाचे अध्यक्ष विक्की गांधी यांनी मंत्री भरतशेठ गोगावले यांना पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला. उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात या सत्काराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. मंत्री गोगावले यांनी हा सन्मान मनापासून स्वीकारत व्यापारी संघटनेचे आभार मानले आणि माणगावातील व्यापारी वर्गाच्या कामगिरीचे कौतुकही केले.
माणगाव व्यापारी संघटनेचा हा सन्मान सोहळा केवळ एक औपचारिकता नव्हे, तर व्यापारी वर्गाच्या एकजुटीचा व सामाजिक बांधिलकीचा प्रत्यय देणारा होता. अशा उपक्रमांमुळे व्यापाऱ्यांमध्ये ऐक्य वाढून समाजहिताचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवता येते, हे या कार्यक्रमातून अधोरेखित झाले.