उरण शिवसत्ता टाइम्स (प्रवीण पाटील):-
पनवेल तालुक्यातील नेरे भोकरपाडा, बोनसेत, चिपळे, विहीघर, कोर्पोली, नेरेपाडा या गावांना जोडणारा मुख्य रस्ता दिवसेंदिवस अधिकच दयनीय होत चालला आहे. रस्त्यावर प्रचंड मोठमोठे खड्डे पडल्याने दुचाकीस्वार, वाहनचालक, शाळकरी विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिक यांचे हाल होत आहेत.रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने लहानमोठे अपघात वाढले असून नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे.रोज या मार्गावरून दूध, भाजीपाला वाहतूक, शाळकरी विद्यार्थ्यांची ये-जा, वारकरी यांची सतत वर्दळ असते.विशेष म्हणजे,सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खान यासह अनेक मान्यवर व्यक्ती ह्या मार्गाचा वापर करतात. तरीदेखील अनेक वर्षांपासून रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही, हे नागरिकांच्या नाराजीचे प्रमुख कारण आहे.नागरिकांनी वारंवार लोकप्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग, अप्पर तहसीलदार आणि पोलिस प्रशासन यांच्याकडे या रस्त्याची दुरुस्ती करण्यासाठी विनंती केली, मात्र त्याकडे दुर्लक्षच करण्यात आले आहे.रस्त्याचे तात्काळ डांबरीकरण न झाल्यास, संतोष सा. शेट्टी यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, अप्पर तहसीलदार, पोलिस प्रशासन यांना लेखी नोटीस देऊन, दोन दिवसांत कारवाई न केल्यास आजीवन आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.