रोहा शिवसत्ता टाइम्स (अक्षय जाधव):-
रोहा नगरपालिका हद्दीतील म्हाडा वसाहतीसमोरील बेकायदेशीर टपऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाने हटवल्यानंतर टपरीधारकांकडून करण्यात येणारे आरोप निराधार असल्याचे म्हाडा वसाहतीतील रहिवाश्यांनी रविवारी स्पष्ट केले. मिळालेल्या माहितीनुसार,म्हाडा वसाहतीत नगरपालिकेमार्फत अनेक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या परिसरात मध्यमवर्गीयांपासून उच्चभ्रू वर्गापर्यंतची घरे वाढली असून मोठी लोकवस्ती तयार झाली आहे.पूर्वी विकास अपुरा असल्याने रहिवाशांची संख्या कमी होती आणि त्याकडे प्रशासन वा नागरिकांचे लक्ष कमी होते. मात्र, गेल्या काही वर्षांत वसाहतीच्या जवळच खारी रोडवर टपऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत गेली व परिसराला बकालपणा आला.स्थानिकांच्या तक्रारींनुसार, या टपऱ्यांमुळे वाहतूक कोंडी, अस्वच्छता आणि सुरक्षेचे प्रश्न निर्माण झाले. याच पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे निवेदन दिले व त्यानंतर कारवाई करण्यात आली. रहिवाश्यांच्या म्हणण्यानुसार, टपरीधारकांचा हेतू फक्त रोजीरोटीपुरता मर्यादित नसून, परप्रांतीयांचा अनियंत्रित वावर, तसेच भविष्यात अनुचित प्रकार घडण्याची भीती असल्याने ही पावले उचलण्यात आली.दरम्यान, या कारवाईत मंत्री आदिती तटकरे व माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांबाबत रहिवाश्यांनी स्पष्ट केले की, “तटकरे कुटुंबावर केलेले आरोप हे निराधार आहेत. तटकरे परिवाराने नेहमीच लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात त्यांना जबाबदार धरणे चुकीचे आहे.