माणगाव शिवसत्ता टाइम्स (दिपक दपके):-
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर आला असून, कोकणवासीयांना आपल्या गावी जाण्याची लगबग सुरू झाली आहे.मात्र,मुंबई-गोवा महामार्गाची रखडलेली कामे आणि रस्त्यावरील प्रचंड खड्डे यामुळे यंदाही गणेशभक्तांना वाहतूक कोंडीचे विघ्न सहन करावे लागणार आहे.गेल्या १७ वर्षांपासून मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी ते अद्याप पूर्ण झालेले नाही. अपूर्ण काम, खड्ड्यांनी भरलेला रस्ता, मुसळधार पावसामुळे खालावलेली रस्त्याची अवस्था यामुळे प्रवाशांचे हाल सुरूच आहेत.गणेशोत्सवाच्या काळात हजारो कोकणवासी आपल्या गावी जाण्यासाठी या महामार्गाचा वापर करतात.मात्र,मोठमोठ्या खड्ड्यांमधून प्रवास करावा लागत असल्याने अपघातांची शक्यता वाढली आहे. प्रवाशांचा प्रवास धोकादायक व बिकट बनला असून, गणेशभक्तांना यंदाही खड्ड्यांचे विघ्न सहन करावे लागणार आहे.यावर्षी मुसळधार पावसामुळे खड्डे बुजवण्याच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत.यामुळे रस्त्यांची दुरुस्ती वेळेत होणार का, हा प्रश्न गणेशभक्तांना पडला आहे.कोकणवासीय व गणेशभक्तांनी आमदार, खासदार आणि मंत्र्यांकडे विशेष विनंती केली आहे की, मुंबई-गोवा महामार्गाच्या डांबरीकरणाचे व चौपदरीकरणाचे काम तातडीने पूर्ण करावे. अन्यथा दरवर्षीप्रमाणे या वर्षीदेखील प्रवाशांना वाहतूक कोंडी आणि अडचणींचा प्रवास सहन करावा लागेल.या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घातलाय आमचे माणगावचे प्रतिनिधी दिपक दपके

