अलिबाग शिवसत्ता टाइम्स (धनंजय कवठेकर):-
रायगड जिल्हा परिषदेतील अनेक कर्मचारी मंत्रालय आणि कोकण भवन येथे प्रतिनियुक्तीवर गेल्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर गंभीर परिणाम झाला आहे.जवळपास १९ कर्मचारी आणि २ ड्रायव्हर यांची प्रतिनियुक्ती झाल्याची माहिती मिळताच,पंडितशेठ यांनी याविरोधात जोरदार आक्षेप घेत ग्रामीण विकास खात्याचे मंत्री यांना पत्र दिले आहे.पंडितशेठ यांनी सांगितले की, रायगड जिल्हा परिषदेच्या तसेच पंचायत समित्यांच्या विविध विभागांमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात प्रतिनियुक्ती दिल्याने जिल्ह्यातील विकासकामे आणि दैनंदिन कामकाज ठप्प झाले आहे. रायगड हा संवेदनशील जिल्हा असून, येथे दरवर्षी पावसाळ्यात साथीचे रोग, दरडी कोसळणे आणि नैसर्गिक आपत्तीचे प्रमाण जास्त असते. अशा परिस्थितीत आरोग्य विभागातील काही महत्वाचे कर्मचारीदेखील प्रतिनियुक्तीवर गेले असल्याने जिल्ह्यात आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याबाबत गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पंडितशेठ यांनी मंत्री महोदयांना दिलेल्या पत्रात नमूद केले की,रायगड जिल्हा हा १५ तालुक्यांचा असून, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन यांसारख्या तालुक्यांमध्ये आधीच कर्मचारी अपुरे आहेत. ठाणे,पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसारख्या जिल्ह्यांतील कर्मचारी प्रतिनियुक्तीवर पाठवले जाऊ शकतात, मग रायगड जिल्ह्यालाच का त्रास द्यावा?” पंडितशेठ यांनी जिल्हा प्रशासनावर थेट आरोप करताना म्हटले की,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अद्याप झालेल्या नाहीत. या गैरसोयीचा फायदा घेत अधिकारी स्वतःच्या पसंतीच्या कर्मचाऱ्यांचे लाड पुरवत आहेत.काही कर्मचारी स्वतःच्या सोयीसाठी प्रशासकीय कालावधीत प्रतिनियुक्तीवर गेले असून, जिल्ह्याचे कामकाज ठप्प झाले आहे.पंडितशेठ यांची राज्य मंत्र्यांना स्पष्ट मागणी केली आहे की, ज्या कर्मचाऱ्यांना वर्षानुवर्षे प्रतिनियुक्तीवर पाठवले आहे, त्यांची प्रतिनियुक्ती तात्काळ रद्द करावी. तसेच, जर मंत्रालय किंवा कोकण भवनासाठी खरोखरच नवीन कर्मचाऱ्यांची गरज असेल, तर नवी भरती प्रक्रिया राबवावी, असेही त्यांनी सुचवले.यासंदर्भात कोकण विभागीय आयुक्त सूर्यवंशी यांच्याशी पंडितशेठ यांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला.मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याचेही समजते.