माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
खांदाड गावातील १६ क्रमांक प्रभागातील (अल्फा हॉस्पिटल समोरील) तब्बल तीन रस्त्यांवरील पथदिवे गेल्या कौक दिवसांनपासून बंद पडल्याने परिसर पूर्ण अंधारमय झाला आहे. रात्रीच्या वेळेस अंधाराच्या साम्राज्य वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना मोबाईल टॉर्च, घरातील दिवे अथवा क्वचित जाणाऱ्या वाहनांच्या उजेडावर अवलंबून राहावे लागत आहे.
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. पूरपाणी घरांच्या अंगणात व ओट्यांपर्यंत शिरल्याने खेकडे, साप, बेडूक व इतर सरपटणारे जल प्राणी रात्री घरात शिरण्याचा धोका निर्माण झाला आहे. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक यामुळे सतत भीतीत जगत आहेत. “मी ज्येष्ठ नागरिक असून घराबाहेर पडणे अवघड झाले आहे,” असे एका वृद्ध महिलेनं तक्रारीच्या सुरात सांगितले. त्यात भर म्हणजे नगरपंचायतीचे कार्यालय मूळ ठिकाणी दुरुस्तीकरिता हलविण्यात आले असल्याने, नागरिकांना प्रत्यक्ष जाऊन तक्रार करणेही कठीण झाले आहे.
दरम्यान, गणेशोत्सव जवळ आला असून घराघरांत भाविकांची वावर असतो. मात्र यंदा अंधारामुळे भाविक व पाहुण्यांना येणं-जाणं असुरक्षित रात्रीची वेळात ठरणार आहे. दिवे बंद पडणे ही केवळ यंदाचीच समस्या नसून वारंवार दिवे बंद पडून दिवसन्दिवस दुरुस्ती न होणे ही सातत्याने सुरू असलेली समस्या असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे.
नागरपंचायतीस या संदर्भात कळविण्यात आले असतानाही अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. गणेशोत्सवाच्या अगोदरच या तीनही रस्त्यांवरील सर्व दिवे दुरुस्त करून सुरू करण्याची तातडीने मागणी रहिवाशांनी केली आहे. अन्यथा नागरिकांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण होईल, अशी भावना व्यक्त केली आहे.