खोपीली शिवसत्ता टाइम्स (खलील सुर्वे):-
खोपोली नगर परिषद मजुरांचा जीव इतका स्वस्त आहे का? नगर परिषद कार्यालयाच्या दादऱ्यावर कार्पेट बसवण्याचे काम सुरू असताना रोजंदारीवर आणलेले मजूर भर पावसात काम करताना दिसले. हातात हॅन्डग्लोज नाहीत, पायात चप्पल, डोक्यावर हेल्मेट नाही, डोळ्याला गॉगल नाही आणि विजेच्या तारांचे जॉईंट पाण्यात ठेवून केवळ प्लास्टिक पिशवीने गुंडाळलेले! हे काम पाहून नागरिकांनी प्रश्न उपस्थित केला… कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचाच जीव महत्वाचा का? तात्पुरत्या मजुरांचा जीव महत्त्वाचा नाही का?
कार्यालयात रोज शेकडो नागरिक येतात. जर एखाद्याला विजेचा धक्का बसला असता किंवा मजुराचा जीव गेला असता तर नगर परिषदेतील वरिष्ठ अधिकारी तो जीव परत आणू शकले असते का? उद्यान व भंडार विभागाचे अधिकारी निलेश लोखंडे यांनी जबाबदारी झटकत सांगितले – “नाक्यावरून लेबर घेतो, त्याला आपण काय सांगणार? प्रत्येकाने स्वतःची काळजी घ्यावी.” मग प्रश्न उभा राहतो की मजुरांच्या सुरक्षेची जबाबदारी कोणाची? नगर परिषदेची नाही का?
मे, जून, जुलै उलटून ऑगस्टमध्ये अर्धा महिना झाला तरी कार्पेट बसवण्याची इतकी घाई का? पावसाआधी हे काम करता आले नसते का? नगर परिषदेला अमेरिकेचे राष्ट्रपती यायचे होते का? नागरिक संतप्त आहेत – रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा जीव मोलाचा नाही का? सुरक्षेविना काम करून घेतले, आणि अपघात झाला असता तर जबाबदार कोण?
मुख्याधिकारी डॉ. पंकज पाटील यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? की डोळेझाक करून “तेरी भी चुप मेरी भी चुप” पद्धतीने हा प्रकार गप्प बसवला जाणार? खोपोलीकर विचारत आहेत – मजुरांचा जीव स्वस्त, की नगर परिषदेचे प्रशासनच बेजबाबदार?