उरण शिवसत्ता टाइम्स (प्रविण पाटील):-
उरण तालुक्यातील नागरिकांनी खड्डे मोजायचे की गणपतीचं आगमन साजरं करायचं? हीच खरी शंका आहे! कारण तालुक्यातील अनेक रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. पावसामुळे रस्त्यांवर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत आणि वाहनधारकांना अक्षरशः जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे.
गणपती बाप्पाचा आगमन सोहळा अवघ्या चार दिवसांवर आला आहे. बाजारात खरेदीसाठी जाणारे गणेशभक्त, छोटे-मोठे वाहनधारक आणि नागरिकांना खड्ड्यांमुळे त्रास सहन करावा लागत आहे. इतकी वर्षानुवर्षं कर भरूनही सरकार नागरिकांना “खड्डेमुक्त रस्ते” देऊ शकत नाही, हा प्रशासनाचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा मोठा निष्काळजीपणा आहे.
मनसेचे तालुकाध्यक्ष अॕड. सत्यवान भगत यांनी या निष्काळजी प्रशासनाला जागं करत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता नरेश पवार यांना निवेदन दिलं. गणपती उत्सवापूर्वी रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा मनसे आक्रमक पवित्रा घेईल असा इशाराही देण्यात आला.
याशिवाय गणपतीच्या दिवसांत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना दिघोडे व खोपटा रस्त्यावर बंदी घालण्याची मागणीही करण्यात आली. गणपती बाप्पाच्या उत्सवात लोकांना त्रास नको, ही साधी अपेक्षा नागरिकांची आहे… पण तीही सरकारकडून पूर्ण होत नाही, हे दुर्दैव आहे.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुकाध्यक्ष अॕड. सत्यवान भगत, नेते निर्दोष गोंधळी, शहराध्यक्ष राहुल पाटील, माजी उपसरपंच दिपक पाटील, विभाग अध्यक्ष राकेश भोईर, तसेच अनिल गावंड, बबन ठाकूर यांच्यासह मनसेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.