रायगड शिवसत्ता टाइम्स (धम्मशील सावंत):-
रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील डोलवी येथील जिंदाल स्टील वर्क्स (जेएसडब्ल्यू) कंपनीच्या थ्री फेज स्टील प्रकल्प विस्तार प्रस्तावाची सार्वजनिक जनसुनावणी पार पडली. या जनसुनावणीमध्ये स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रकल्पाला एकमुखी पाठिंबा दर्शविला. या जनसुनावणीत दोन महत्त्वाचे विषय मांडण्यात आले… थ्री फेज स्टील प्लांट विस्ताराला पर्यावरणीय परवानगी आणि जेटी विस्तारासाठी पर्यावरणीय परवानगी. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या परवानग्यांपूर्वी स्थानिकांना आपले मत व्यक्त करण्याची संधी दिली. नागरिकांनी या संधीचा फायदा घेत प्रकल्प विस्ताराच्या बाजूने ठामपणे भूमिका मांडली.
नागरिकांनी स्पष्टपणे सांगितले की, प्रकल्प विस्तार ही काळाची गरज आहे. या प्रकल्पामुळे रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार असून, स्थानिक युवकांना कामाच्या नव्या दारांचा लाभ होईल. रोजगार निर्मितीमुळे आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचे मत मांडले गेले. जनसुनावणी दरम्यान रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा आणि स्थानिक विकास या मुद्यांवर नागरिकांनी उत्साहाने समर्थन दर्शविले. “रोजगार निर्माणासाठी प्रकल्प विस्तार अत्यावश्यक आहे,” असा जोरदार आवाज संपूर्ण जनसुनावणीत घुमला.
स्थानिकांचा प्रचंड पाठिंबा मिळाल्याने जेएसडब्ल्यूचा थ्री फेज प्रकल्प विस्ताराचा मार्ग अधिक सुकर होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या प्रकल्पामुळे रायगड जिल्ह्यात औद्योगिक प्रगतीबरोबरच रोजगार आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला जाणार आहे.