गणेशोत्सव आणि ईद ए मिलाद सुरक्षिततेसाठी आवश्यक परवानगी व नियम… मंडप आणि दर्शनासाठी व्यवस्थापन तसेच सुरक्षा उपाय…

0
1

चौक शिवसत्ता टाइम्स (अर्जुन कदम):-

आगामी गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त खालापूर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटी, मोहल्ला समिती आणि गणेश मंडळांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल नेहुल यांनी सणांच्या काळात सुरक्षितता आणि शांतता राखण्याबाबत आवश्यक सूचना दिल्या.

सार्वजनिक गणेशोत्सवासाठी पोलीस परवानगी घेणे आवश्यक असून, ग्रामपंचायत व तहसिलदार यांच्या परवानग्या देखील मिळवाव्यात. मंडप मजबूत असावे, वाहतुकीस अडथळा येऊ नये, तसेच मंडप व मूर्तीच्या ठिकाणी २४ तास स्वयंसेवक आणि CCTV बसवावे, असे सांगितले गेले. लाईट व्यवस्था कायदेशीर पद्धतीने करावी, धार्मिक भावना दुखावणारे देखावे, बॅनर अथवा आक्षेपार्ह मजकुर टाळावा, दर्शनासाठी स्त्री-पुरुषांची वेगवेगळी रांगा ठेवाव्यात.

वर्गणी स्वेच्छेने घेण्यास परवानगी असून, घरोघरी जबरदस्तीने वर्गणी मागणे मनाई आहे. विसर्जन मिरवणुकीत वाहतुकीस अडथळा होऊ नये, आक्षेपार्ह घोषणाबाजी, गाणी, अश्लील नृत्य, महिलांची छेडछाड होणार नाही याची दक्षता आयोजकांनी घ्यावी. ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन, सामाजिक अंतर राखून आरोग्यविषयक शिबीर, स्वच्छता आणि जनजागृती करावी.

विसर्जनासाठी शक्यतो कृत्रिम तलाव तयार करावा. ग्रामपंचायतीकडून प्रकाश, लाईफ जॅकेट, बोट, स्वयंसेवक यांची व्यवस्था करावी, तसेच निर्माल्य कलशाची तयारी करावी. ईद ए मिलादच्या मिरवणुकीदरम्यान मशिदीसमोर वाद्य जोरात वाजविणे, गुलाल उधळणे किंवा नमाजात अडथळा निर्माण होऊ नये.

सदर सणांच्या दरम्यान मार्गावर विसर्जन मिरवणुकीचा मार्ग एकत्र असल्यास दोन्ही गटांनी बंधुभाव राखावा, असे आवाहन पोलिसांनी केले. बैठकीला खालापूर पोलीस निरीक्षक सचिन पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मोरे आणि चौक प्रभारी विशाल पवार उपस्थित होते