माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
गणेशोत्सव अगदी दारात आला असतानाच माणगावातील एन.एच.–६६ मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाला निजामपूर कॉर्नरला जोडणारा व पुढे मोर्बा रोडकडे जाणारा पोवारवाडा–बामणोली तसेच गांधी बँक्वेट हॉलमार्गे जाणारा महत्त्वाचा अंतर्गत रस्ता शेवटच्या क्षणी दुरुस्तीला लागला आहे. आज रविवारी दि. २४ रोजी ऑगस्ट, २०२५ सकाळ ०९:३० पासून मोठमोठे खड्डे बुजवणे, पॅचवर्क व डांबरीकरण सुरू झाले असून जेसीबी, रोड रोलर व कामगारांच्या साहाय्याने कामे केली जात आहेत. सदर ठिकाणी वाहतूक बंद करून हे काम सुरू झाल्यामुळे पुणे व मुंबईहून श्रीवर्धनकडे जाणाऱ्या वाहनांना अडचणी निर्माण होणार आहेत. हा रस्ता पूर्वी पाट होता व दलदलीच्या जमिनीवर तयार झाल्याने पावसाळ्यात वारंवार खचतो. सार्वजनिक बांधकाम विभागाने काही पूल बांधले असले तरी जवळपास १ किलोमीटरचा पट्टा अत्यंत दयनीय स्थितीत आहे. मोठमोठे खड्डे, अपघातप्रवण खड्डेमय पट्टे, एका बाजूला अंशतः वाहतुकीसाठी खुला तर दुसऱ्या बाजूला पूर्णपणे धोकादायक अशी अवस्था निर्माण झाली आहे. शिवाय शहरातील बामणोली रोड ते गांधी बँक्वेट हॉल मागील मार्ग अजूनही पाणी व गवताने व्यापलेला आहे. १४ ते २२ ऑगस्टदरम्यान गोद नदीला आलेल्या पुरामुळे हा मार्ग पूर्ण पाण्याखाली गेला होता आणि वेळेत लक्ष न दिल्याने आता शेवटच्या क्षणीच घाईघाईत दुरुस्ती सुरू झाली आहे. दरम्यान हवामान खात्याने ३० ऑगस्टपर्यंत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा दिला असल्याने सुरू असलेली कामे अडथळ्यात येण्याची शक्यता आहे. त्यात सणासुदीच्या गर्दीमुळे महामार्गासह या मार्गावर वाहतूक कोंडी वाढण्याची भीती नागरिक व प्रवाशांतून व्यक्त होत आहे.