गणेशोत्सवात मोफत बस-रेल्वे सेवा भक्तांसाठी की मतांसाठी?… कोकणवासीयांची मनं जिंकण्यासाठी नेत्यांची मोफत सेवा स्पर्धा…

0
4

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

गणेशोत्सव आणि कोकणवासीयांचे नातं अतूट आहे.बाप्पाच्या दर्शनासाठी हजारो कोकणवासीय गावाकडे निघाले आहेत.त्यांच्यासाठी विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांकडून मोफत बस सेवा,रेल्वे तिकिटांची सोय उपलब्ध करून दिली जात आहे.वर्षभर कोकणात राहू न शकणारे हजारो लोक बाप्पाच्या स्वागतासाठी गावाकडे परततात. पण त्यांच्यासाठी सर्वात मोठा प्रश्न असतो तो प्रवासाचा.रेल्वेच्या गाड्यांमध्ये जागा मिळणे अवघड, बसच्या लांबच लांब रांगा, वाहतुकीतील अडचणी…यामुळे भाविकांची गैरसोय होते.याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून विविध राजकीय पक्ष, नेते आणि संस्थांनी मोफत बस व रेल्वे तिकिटांची सोय करून दिली आहे.काही ठिकाणी तर गावागावात जाणाऱ्या खासगी बसचा संपूर्ण प्रायोजित करून भाविकांना उपलब्ध करून दिल्या जातात.यंदाही ही परंपरा कायम असून अनेक ठिकाणी मोफत बस सेवा सुरू करण्यात आली आहे.परंतु प्रश्न असा आहे की,आजच्या जगात काहीही मोफत मिळत नाही.मग या सेवेमागे नेमका हेतू काय? राजकारणात भावनांना खूप महत्त्व असते.कोकणवासीयांच्या ‘बाप्पा मोरया’ या घोषणेतील उत्साह,गावाशी असलेलं नातं आणि सणावरील प्रेम याचा राजकीय पातळीवर फायदा उठवला जातो,अशी टीका विरोधक करतात.स्थानिक कार्यकर्त्यांकडून ते मोठ्या नेत्यांपर्यंत सर्वत्र भाविकांची मनं जिंकण्यासाठी चढाओढ सुरू आहे…कुणी मोफत बससेवा जाहीर केली,कुणी मोफत रेल्वे तिकिटांची सोय केली,तर काही ठिकाणी मोफत जेवण व पाण्याच्या बाटल्याही वाटल्या जात आहेत.या सर्व उपक्रमांमध्ये भक्तांना दिलासा मिळत असला, तरी नागरिकांच्या मनात प्रश्न निर्माण झाला आहे… ही खरी सेवा की राजकीय गुंतवणूक? गणेशोत्सव हा श्रद्धेचा आणि भक्तीचा उत्सव आहे.मोफत बस वा रेल्वे सेवा ही भाविकांसाठी मोठा दिलासा आहे, हे निर्विवाद.पण यामागे भक्तीपेक्षा राजकारणाचा रंग जास्त ठळकपणे दिसतो.प्रश्न शेवटी तसाच उरतो ही खरी सेवा आहे का भाविकांच्या मतांवरील गुंतवणूक?याचे उत्तर येणाऱ्या निवडणुकीत मतदारच देतील…