पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सोमवारी भीषण अपघाताची घटना घडली.एनएमएमटीची ७३ नंबर बस (क्रमांक MH 43-H -5334) कल्याण येथून पनवेलकडे येत असताना अचानक तिचा ब्रेक फेल झाला.या प्रसंगात चालकाने वेळीच दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी जीवितहानी टळली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,एनएमएमटीची ७३ नंबर बस कल्याण येथून पनवेलकडे येत असताना स्थानक परिसरात बस पोहचली. मात्र पुन्हा निघत असतानाच अचानक ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले.त्याने तातडीने बसचे स्टेअरिंग बाजूला वळवून ती थेट रेल्वे स्थानकाच्या संरक्षण भिंतीवर आदळवली.जोरदार धडकेत भिंतीचे आणि बसच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असले तरी प्रवाशांचे प्राण वाचले.समोरच बस थांब्याजवळ प्रवासी उभे होते,तसेच रिक्षा स्थानकाजवळ देखील मोठी गर्दी होती.चालकाने धोक्याची जाणीव होताच बस त्या दिशेला न नेता भिंतीवर आदळवली.अन्यथा बस थेट थांब्यावर किंवा रिक्षा स्थानकावर धडकली असती आणि अनेकांचे जीव धोक्यात आले असते.या अपघातात मोठ्या प्रमाणावर दगड-मलबा रस्त्यावर पडला.काही प्रवासी किरकोळ जखमी झाल्याचे वृत्त असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. सुदैवाने गंभीर दुखापत अथवा मृत्यू झाल्याची माहिती मिळालेली नाही. पनवेल हा रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा केंद्रबिंदू आहे. येथे दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात.त्यामुळे अशा दुर्घटनांचा परिणाम मोठ्या संख्येने लोकांवर होऊ शकतो. या अपघातामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असले तरी चालकाच्या तातडीच्या निर्णयामुळे शेकडो लोकांचा जीव वाचला.