माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण कोकणात उत्साहाचे वातावरण असून माणगावातही वाहतूक व्यवस्थापनासाठी काटेकोर नियोजन व एकत्रित प्रयत्न सुरू आहेत.माणगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निवृत्ती बो-हाडे यांनी दिलेल्या माहितीनुसार,सध्या सुरू असलेल्या गर्दीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विविध विभागांची मदत घेऊन नियोजन केले गेले आहे.
पोलीस अधीक्षक आंचल दलाल मॅडम तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच वाहतूक विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO), राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI), पोलीस कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, मार्शल्स, होमगार्ड व वॉर्डन्स अशी एक संयुक्त टीम दिवस–रात्र कार्यरत आहे. सूक्ष्म नियोजन आणि प्रत्येक टप्प्यावर लक्ष ठेवून वाहतूक कोंडीस तोंड देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
गेल्या तीन दिवसांपासून वाहतुकीचा प्रवाह सुरळीत ठेवण्यात आम्ही यशस्वी ठरलो आहोत. मात्र आज,गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी, वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे, असे बोहाडे यांनी सांगितले.त्यांनी पुढे माहिती दिली की गणेश चतुर्थीच्या दिवशी देखील हाच बंदोबस्त कायम ठेवला जाणार आहे, कारण बाजारपेठेत माणगावकरांची प्रचंड गर्दी अपेक्षित आहे. तसेच माणगाव व्यापारी संघटना देखील पोलिसांना सहकार्य करत असून त्यामुळे वाहतूक सुरळीत ठेवण्यात मदत होईल,असेही त्यांनी नमूद केले.
माणगाव पोलिसांविषयी भाविकांनी व्यक्त केलेल्या कृतज्ञतेबद्दल बोलताना बोहाडे म्हणाले, वाहतुकीचे व्यवस्थापन करताना माणगाव पोलिस हे फक्त एक निमित्त आहे…प्रत्यक्षात याचे श्रेय पोलीस अधीक्षक आंचल मॅडम यांचे उत्कृष्ट सूक्ष्म नियोजन, महामार्ग पोलिस अधिक्षकांचे मोलाचे सहकार्य, वाहतूक विभाग आणि सर्व घटकांच्या संयुक्त प्रयत्नांना जाते. या टीमवर्कचे खरोखर कौतुक व्हावे.
शेवटी भाविकांना संदेश देताना ते म्हणाले,आम्ही तुमच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर आहोत. तुम्ही सुखरूप घरी पोहोचा,आनंदाने गणेशोत्सव साजरा करा.कुठल्याही प्रकारची चिंता करू नका आम्ही तुमच्यासाठी सदैव तयार आहोत…