माणगावात जिल्हाधिकाऱ्यांचा कार्यक्रम आयोजकांनी दिलीच नाही प्रशासनाला कल्पना…

0
20

माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

रायगड जिल्हाधिकारी किसन जावळे यांचा माणगाव नगरीतील वृक्षारोपण वाटपाचा कार्यक्रम शुक्रवारी दि. 26 सप्टेंबर 2025 रोजी पार पडला. मात्र या कार्यक्रमाने स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणाची धक्कादायक पोकळी जनतेसमोर उघड केली आहे. जिल्हाधिकारी स्वतः कार्यक्रमस्थळी उपस्थित असतानाही ना प्रांताधिकारी, ना तहसीलदार, ना कृषी अधिकारी, ना महसूल विभाग – एकही स्थानिक अधिकारी तेथे दिसला नाही. याबाबत आश्चर्य व्यक्त करत जावळे यांनी थेट प्रश्न विचारला की, “मी जिल्हाधिकारी म्हणून येथे उपस्थित आहे, मग प्रशासन कुठे आहे? निदान कृषी विभागाला तरी या वृक्षारोपण कार्यक्रमाची कल्पना द्यायला हवी होती.” त्याचबरोबर आपल्या भाषणात त्यांनी स्पष्ट केले की, “माझी उपस्थिती कुठेही असते, तेव्हा संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा प्रोटोकॉलप्रमाणे दिसायला हवी. हा नियम आहे, पण येथे काहीच दिसले नाही.” त्यांच्या या नाराजीतून संपूर्ण प्रशासनाच्या कारभारशैलीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

हा कार्यक्रम माणगाव एसबीआय बँकेच्या सीएसआर निधीतून, मुंबईस्थित स्वराज्य संस्था व माणगावातील सर्व विकास दीप संस्थेच्या संयुक्त विद्यमाने रात्री उशिरा दहाच्या सुमारास पार पडला. बँकेचे प्रबंधक विलास शिंदे, शाखा व्यवस्थापक सुशील भस्मे, स्वराज्य संस्थेचे प्रमुख तथा कार्यक्रमचे मुख्य आधार स्तंभ तसेच महाराष्ट्र राज्य नियोजन चे अधिकारी लक्ष्मण जाधव तसेच सर्व विकास दीप संस्थेचे सहसंचालक फादर मॅथ्यू आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र जिल्हाधिकाऱ्यांच्या इतक्या महत्त्वाच्या उपस्थितीतही प्रशासनाचा एकही अधिकारी हजर नव्हता, हे केवळ लाजिरवाणेच नव्हे तर प्रशासनाच्या समन्वयाच्या पूर्ण अपयशाचे ज्वलंत उदाहरण ठरले आहे. कार्यक्रम दीड तास उशिरा सुरू झाला तरीही प्रशासनाचा एकही प्रतिनिधी न दिसणे ही खरंच गांभीर्याची बाब ठरली आहे.

संपूर्ण घटनेतून प्रशासनातील जबाबदारीचा अभाव,निष्काळजी वृत्ती आणि समन्वयाचा ढिसाळपणा उघड झाला आहे.नागरिकांमध्ये चर्चा सुरू असून,इतक्या महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांचा दौरा होत असताना प्रशासनाला त्याची साधी कल्पनाच नसणे हे दक्षिण रायगडसाठी मोठी शोकांतिका असल्याचे म्हटले जात आहे.विशेष म्हणजे,आमचे जिल्हा प्रतिनिधी पत्रकार नरेश पाटील यांनी मात्र वेळेवर माहिती मिळवून कार्यक्रमाला उपस्थित राहून वृत्तांकन केले.