१४ गावांचा विकासनिधी ७० कोटी,तरीही समावेशाला विरोध राजकारण तापलं… १४ गावांच्या समावेशावरून नवी मुंबईत शिंदे आणि नाईक आमनेसामने…

0
15

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट केलेली १४ गावे सध्या राजकीय आणि स्थानिक वर्तुळात चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहेत. या १४ गावांचा समावेश करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने संघर्ष सुरू आहे.गेल्या आठवड्यातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या गावांच्या विकासासाठी ७० कोटी रुपयांचा निधी देण्याचे आदेश दिले होते. तथापि, या गावांना नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट करण्यास विरोध दर्शवित वनमंत्री गणेश नाईक यांनी ठाम भूमिका घेतली आहे. कोणत्याही परिस्थितीत १४ गावे महापालिकेत सामील होऊ देणार नाही,” असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

यावर समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,नाईक साहेबांची नाराजी ही इतर काही कारणांमुळे असू शकते. GR काढताना त्यांना आमंत्रण न मिळाल्यामुळे काही राग असावा. मात्र आम्ही त्यांना नेहमीच पालकत्वाची भूमिका घ्यावी अशी विनंती केली आहे. आम्ही पक्षाचे काम गेल्या ३०-३५ वर्षांपासून करत आहोत.पाटील पुढे म्हणाले,आम्ही ४-५ महिन्यांपासून भेट मागतोय, पण ती मिळालेली नाही. आम्ही लोकहितासाठीच १४ गावांचा प्रश्न पुढे नेतोय. नवी मुंबईच्या राजकारणापलीकडे जाऊन नाईक साहेबांनी या गावांना पालकत्व द्यावं,अशी आमची अपेक्षा आहे.या विषयावर पुढील निर्णयासाठी समिती लवकरच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.दरम्यान,या विषयावर राजकीय हालचालींना वेग आला असून नवी मुंबईच्या विकास आणि प्रशासनिक रचनेवर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

यावेळी सदर बैठकीस समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांच्यासोबत उपाध्यक्ष सुखदेव पाटील,सचिव गुरुनाथ पाटील,गणेश जेपाल,राजेश पाटील,लक्ष्मण येंदारकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते…