पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि सर्व राजकीय पक्षांनी आंदोलन करीत सरकारला इशारा दिला होता.त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देणार अशी घोषणा केली. अखेर विमानतळाच्या उद्घाटनाचा दिवस उजाडला. बुधवारी (दि.8) आपल्या लोकनेत्यांचे नाव विमानतळाला देणार यामुळे आंदोलकर्त्याचा उत्साह शिगेला पोहचला होता.
उद्घाटन कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रम संपत आला. त्यावेळी शेवटच्या भाषणांपैकी मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांच्या भाषणात दि. बा. पाटील यांच्या नावाचा उल्लेख संघर्षयोद्धा म्हणून झाला. हे सर्व ठीक वाटले. परंतु, दोन्ही नेत्यांनी विमानतळाच्या नामकरणाबाबत कोणतीच ठोस घोषणा केली नाही. यामुळे स्थानिकांचा भ्रमनिरास झाला. विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जाहीर करतील हे कानात साठवून ऐतिहासिक साक्षीदार बनण्यासाठी गेलेल्या स्थानिक नागरिकांचे स्वप्न धुळीस मिळाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात लोकनेते दि. बां. पाटील यांना अभिवादन करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव देण्याचा उल्लेख टाळल्याने प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण पसरल्याचे पाहायला मिळाले. तसेच राज्यातील नेत्यांनी देखील दिबांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख आपल्या भाषणात न केल्याने नेत्यांनी प्रकल्पग्रस्तांच्या तोंडाला एकप्रकारे पाने पुसत दगा दिल्याची भावना स्थांनिकांनी व्यक्त केली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी विमानतळाला लोकनेते दि. बां. पाटील यांच्या नावाची घोषणा करतील हे अपेक्षित होते.प्रत्यक्षात मात्र आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केवळ दिबांचे नाव घेत उपस्थित स्थानिकांचा भ्रमनिरासच केला. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार तसेच अन्य नेत्यांनी दिबांचे नाव घेणे टाळले.