माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
माणगाव शहरात नुकत्याच उद्घाटन झालेल्या काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाने पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील काँग्रेस संघटनेच्या निष्क्रियतेचा आणि अधोगतीचा मुद्दा समोर आणला आहे. विशेष म्हणजे, या उद्घाटन समारंभास रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र घरत अनुपस्थित राहिल्याने कार्यकर्त्यांत नाराजी व्यक्त होत आहे.
एकेकाळी काँग्रेसचा मजबूत किल्ला म्हणून ओळखला जाणारा रायगड जिल्हा आज पक्षाच्या अस्तित्वाच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचला आहे. गेल्या काही वर्षांपासून जिल्हा कार्यकारिणीच्या उदासीनतेमुळे आणि संघटनात्मक दुर्लक्षामुळे पक्षाची परिस्थिती खालावली आहे. विशेषतः दक्षिण रायगडात, माजी आमदार माणिक जगताप यांच्या निधनानंतर आणि अनेक वरिष्ठ नेत्यांच्या अन्य पक्षांत झालेल्या प्रवेशानंतर काँग्रेस जवळपास नामशेष झाली आहे.
महेंद्र घरत, जे उत्तर रायगड येथील असून व्यवसायिक व कामगार संघटनेचे नेते आहेत, परंतु परदेशातील व्यावसायिक बांधिलकीमुळे ते जिल्ह्यात फारसे सक्रिय नाहीत. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात केवळ काही कार्यक्रम उत्तर रायगडपुरतेच मर्यादित राहिले. त्यामुळे दक्षिण रायगडमधील अनेक कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष कोण आहेत हे सुद्धा माहीत नाही.
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांदरम्यान रायगड काँग्रेसने स्वतःचा उमेदवार उभा केला नाही, आणि प्रचार मोहिमांमध्ये जिल्हाध्यक्ष अनुपस्थित राहिल्याचे चित्र दिसले. उलट राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या सभेस ही ते अनुपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले, ज्यामुळे त्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.
पूर्वीच्या काही कार्यक्रमांतही त्यांच्या निष्क्रियतेचे चित्र दिसले. माणगाव नगरपंचायत निवडणुकीच्या काळात ते रात्री उशिरा सभास्थळी पोहोचले आणि आचारसंहितेमुळे काही क्षणातच व्यासपीठावरून उतरावे लागले. अशीच आणखीन एक उदाहरण जसे माणगाव ता. नवनियुक्त काँग्रेस पक्ष कार्यक्रमाचा संपन्न वेळेत येऊन पुस्प गुच्छ देऊन महेंद्रशेट घरत हे तेथून निघून गेले होते.
यानंतर ८ ऑक्टोबर २०२५ रोजी माणगाव तालुका काँग्रेसच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी पुन्हा एकदा जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत अनुपस्थित राहिले. उद्घाटन प्रसंगी तालुका अध्यक्ष विलास सुरवे आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगांवकर यांनी आपल्या भाषणात या अनुपस्थितीचा उल्लेख करत सांगितले की, घरत हे नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटन समारंभास गेले असल्यामुळे येऊ शकले नाहीत.
याच कार्यक्रमात, महेंद्र घरत यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या काँग्रेस पक्षाच्या उद्घाटन सोहळ्यात अवघे १५ लोकच उपस्थित होते. या निमित्ताने पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती आणि संघटनशक्ती किती दयनीय स्थितीत आली आहे, हे स्पष्टपणे दिसून आले.
या सर्व घटनांमुळे प्रश्न निर्माण झाला आहे की रायगड काँग्रेस जिल्हाध्यक्ष म्हणून आपल्या पक्षाच्या कार्यक्रमाला दुरावून भाजप सरकारच्या मंचावर उपस्थित राहणे योग्य ठरते का?या विरोधाभासामुळे पक्षातील नेतृत्वाचा अभाव, कार्यकर्त्यांचा विश्वासघात आणि संघटनशक्तीचा पूर्णतः ऱ्हास उघड झाला आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, जर तातडीने पक्षात समन्वय, सक्रियता आणि पुनर्रचना करण्यात आली नाही, तर रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे भविष्य पूर्णतः अंधकारमय होईल.