दिवाळी संपली…रायगडात आता राजकारणाची खरी फटाकेबाजी सुरू… महायुती ,महाविकास आघाडी राहणार की तुटणार ? सर्वांचे लक्ष…

0
3

रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):- 

दिवाळीचे फटाके शांत झाले, पण आता राज्यात आणि विशेषतः रायगडात राजकारणाची आतिषबाजी सुरू होण्याची चिन्हं दिसत आहेत.कारण, लवकरच राज्यभर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगूल वाजणार आहे. ग्रामपंचायतींपासून जिल्हा परिषदेपर्यंतच्या निवडणुका येत असल्याने राजकीय तापमान झपाट्याने वाढू लागले आहे.रायगड जिल्ह्यातही महायुती आणि महाविकास आघाडी अशी दोन मोठी राजकीय समीकरणं आहेत.पण,या आघाड्या प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत टिकतील का,हा खरा प्रश्न आहे.कारण महायुतीमधीलच अंतर्गत मतभेद उफाळून येत आहेत,तर विरोधी पक्षांचे चित्र फारसं उत्साही नाही. राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे नेते सुनील तटकरे आणि शिवसेना (शिंदे गट) मधील तिन्ही आमदारांमध्ये सध्या वाद पेटलेले आहेत. त्यामुळे महायुतीचे स्थानिक पातळीवरील समीकरण विस्कटले आहे. आगामी निवडणुका हे दोन्ही पक्ष निवडणुकीच्या रणांगणात एकत्र येतात की स्वतंत्र लढतीचा मार्ग स्वीकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपचे अगदी पध्दतशीरपणे मार्गक्रमण सुरु आहे. दरम्यान,भाजप मात्र शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करत आहे. दोघे भांडो, सत्ता आपली असा विश्वास भाजपने मनात ठेवलेला दिसतो. त्यांनी दोन्ही बाजूंच्या वादात नाक न घालता आपलं बळ वाढवण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. दुसऱ्या बाजूला विरोधी महाआघाडीची अवस्था मात्र फारशी चांगली नाही. शेकाप अधूनमधून रस्त्यावर दिसते, पण काँग्रेस आणि इतर पक्षांचा आवाज जवळपास गायब झाल्यासारखा आहे. त्यामुळे रायगडात ही निवडणूक “महायुती विरुद्ध महाआघाडी” एवजी “महायुती विरुद्ध महायुती” अशी रंगण्याची शक्यता जास्त आहे. नगरपरिषद, नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या सर्वच निवडणुकांसाठी पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. दिवाळीनंतर अनेक नेत्यांनी जनसंपर्क वाढवायला आणि हातपाय पसरायला सुरुवात केली आहे.आता काही आठवड्यांत आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, भाषणांची आतिषबाजी आणि कार्यकर्त्यांच्या मोर्चा-मंडळींची गर्दी सुरू होणार आहे. म्हणजे दिवाळी संपली असली, तरी रायगडच्या राजकारणात खरी “राजकीय दिवाळी” आता पेटणार आहे!