उरणमध्ये गॅस माफियांचा पर्दाफाश ! पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखोंचा मुद्देमाल जप्त…

0
14

उरण शिवसत्ता टाईम्स (प्रविण पाटील ):-

उरण तालुक्यात गॅस सिलेंडरच्या नावाखाली सुरु असलेला बेकायदेशीर गॅस विक्रीचा धंदा अखेर पोलिसांच्या सापळ्यात सापडली  आहे. घरगुती व व्यावसायिक सिलेंडर मधील गॅस अवैधरित्या काढून त्याचा काळाबाजारा करणाऱ्या रॅकेटवर उरण पोलिसांनी पुरवठा विभागाच्या मदतीने धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल रुपये २४ लाख १२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या प्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून तिघांना अटक करण्यात आली आहे.

उरण तालुक्यातील  द्रोणागिरी सेक्टर ५० परिसरात उरण पोलिस आणि पुरवठा निरीक्षण विभागाने संयुक्तपणे ही कारवाई केली. जीवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५  उल्लंघन करून गॅस माफिया रॅकेट भारत गॅसच्या व्यावसायिक सिलेंडरमधील गॅस एका लोखंडी पाईपच्या साहाय्याने घरगुती सिलेंडरमध्ये भरत होते. नंतर हे सिलेंडर बेकायदेशीरपणे विकून आरोपी मोठ्या प्रमाणावर नफा कमवत होते.

प्रभारी पुरवठा निरीक्षक प्रभाकर पद्माकर नवाळे यांनी या प्रकरणी लेखी तक्रार दिल्यानंतर उरण पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. कारवाईदरम्यान पोलिसांनी भारत गॅसचे २७७ व्यावसायिक सिलेंडर, एचपी कंपनीचे ५  किलो वजनाचे ६० भरलेले आणि ८ रिकामे घरगुती सिलेंडर, तसेच एक टाटा टेम्पो (मॉडेल १११२ ), दोन बोलेरो जीप आणि गॅस भरण्यासाठी वापरण्यात येणारा लोखंडी पाईप असा मोठा माल जप्त केला.

या प्रकरणी पोलिसांनी बालाजी धोंडीबा साळवी वयवर्ष ४०, मनोहर गणेश गोंड  वयवर्ष ३६ आणि सुरेशकुमार सखाराम माजरा वयवर्ष ३० या तिघांना घटनास्थळीच अटक केली आहे. चौथ्या आरोपीचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक स्मिता अशोक पवार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या कारवाईनंतर उरण तालुक्यातील बेकायदेशीर गॅस व्यापार करणाऱ्या माफियांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. स्थानिकांच्या सुरक्षेशी खेळणारा आणि जीवघेणा ठरु शकणारा हा काळाबाजारीचा प्रकार उघडकीस आणल्याबद्दल उरण पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.