माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे उर्फ ‘बाळ्या मामा’ यांचे मंगळवारी माणगावात उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. रायगड जिल्ह्यातील त्यांच्या एकदिवसीय दौर्याच्या निमित्ताने ते माणगावात दाखल झाल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील एस.टी. स्थानकाजवळ माणगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) अध्यक्ष राजू रोडेकर यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचा जल्लोषात सत्कार केला. तसेच इतर मान्यवरांचेही स्वागत करण्यात आले.
यावेळी उपस्थित प्रदेश सरचिटणीस – संतोष दादा घरत, रायगड जिल्हा महिला अध्यक्ष दीपाली ताई भांडारकर, विधानसभा अध्यक्ष अझर भाई धनसे, रायगड जिल्हा सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष सदानंद येलवे, रायगड जिल्हा महिला उपाध्यक्षा अश्विनी महाडिक, माणगाव तालुका महिला अध्यक्ष प्राजक्ता जाधव माणगाव शहराध्यक्ष जगदीश बुटे युवा कार्यकर्ते अस्मित काळे, रोशन वाकळे, सौरभ सोनार यांसह तालुक्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाड शहराला रेल्वे जंक्शन स्टेशन मिळावे, या महाडवासियांच्या दीर्घकाळ प्रलंबित मागणीसंदर्भात तहसीलदारांनी बोलावलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित राहण्यासाठी खासदार सुरेश म्हात्रे रायगडात आले होते. या बैठकीसाठी त्यांना रायगड जिल्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्ष अध्यक्ष रवींद्र हरिचंद्र चव्हाण यांनी आमंत्रण दिले होते.
अलीकडेच, रेल्वे जंक्शनच्या मागणीसाठी महाड राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष पराग वडके यांनी रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली अनिश्चितकालीन उपोषण सुरू केले होते. उपोषणाच्या दुसऱ्याच दिवशी प्रशासनाने तातडीने दखल घेत आश्वासन दिले. संबंधित कोकण रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधून रत्नागिरी येथील अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यास मान्यता मिळाली. त्या अनुषंगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी, मंगळवार, सकाळी ११ वाजता महाड येथे बैठक निश्चित करण्यात आली.
या जनहिताच्या प्रश्नाला गती मिळावी यासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ही बाब राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या निदर्शनास आणून त्यांचा पाठिंबा मिळविला. त्यानंतरच भिवंडी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुरेश गोपीनाथ म्हात्रे यांना महाड येथे उपस्थित राहण्यासाठी निमंत्रण देण्यात आले, आणि त्यांनी ते स्विकारत रायगड दौरा निश्चित केला.
माणगावातील स्वागत सोहळ्यानंतर सर्व मान्यवरांचे पथक महाड शहरातील बैठकीसाठी रवाना झाले.

