नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (दिपक कांबळे):-
नवी मुंबई पोलिसांनी मोठी कामगिरी करत बनावट पोलीस बनून फसवणूक करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे.३१ जुलै २०२५ रोजी खारघर येथे ६८ वर्षीय पवनकुमार केजरीवाल यांची १.५ लाख रुपयांच्या दागिन्यांची फसवणूक झाली होती.आरोपीने स्वतःला पोलीस अधिकारी म्हणून दाखवून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीला गांजा सापडला आहे असे सांगून त्यांचे दागिने बॅगेत ठेवायला सांगितले आणि हातचलाखीने चोरी केली. घटनेनंतर खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. वरिष्ठ अधिकारी पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहाय्यक पोलीस आयुक्त संजय येनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दीपक साकोरे, आणि पोलीस उप आयुक्त (गुन्हे) सचिन गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू झाला.
गुन्हे शाखा कक्ष २ च्या पथकाने २०–२५ दिवस सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा माग काढला. तपासातून आरोपीची टीव्हीएस (MH 15 BA 1617) ही दुचाकी सापडली. त्यावरून पोलिसांनी पुण्यातील कोंढवा येथे छापा टाकला. त्यावेळी आरोपी सज्जाद गरीबशहा इराणीची पत्नी फिजा इराणी ही चोरीचे दागिने विकण्यासाठी जात असताना पकडली गेली. तिच्याकडून ११८६ ग्रॅम सोन्याचे दागिने आणि बनावट आयडी, आधारकार्ड, पॅनकार्ड असा मुद्देमाल जप्त झाला.
यानंतर सज्जाद इराणीला २८ ऑक्टोबर २०२५ रोजी अटक करण्यात आली असून, ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर झाली आहे. आरोपीने कबुली दिली की त्याने नवी मुंबई परिसरात १५ गुन्हे आणि इतर ठिकाणी १०० पेक्षा अधिक गुन्हे केले आहेत. आरोपीवर MCOCA कायद्यानुसारही कारवाई करण्यात येत आहे.
या उल्लेखनीय कारवाईत सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे शाखा) श्री. अजयकुमार लाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली,वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील,सह सपोनि एकनाथ देसाई, पोउपनि देशमुख, पोहवा धनवटे, पोहवा दुधाळ, पोहवा जोशी, पोहवा पाटील, पोहवा जेजुरकर, पोहवा पांचाळ, मपोह चंदगिर, पोहवा सावंत, पोना मोरे, पोना गायकवाड, पोशि तांदळे, पोशि भोये, मपोशि गायकवाड यांनी महत्वपूर्ण भूमिका बजावली.

