माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):-
रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यात यंदाचा मॉन्सून अनेक दशकांतील सर्वात अनोख्या आणि विचित्र रूपाने पाहायला मिळाला. सामान्यपणे मान्सून मेच्या शेवटच्या आठवड्यात दाखल होतो व १५ ऑक्टोबरपर्यंत देशातून माघारी निघतो. मात्र या वर्षी मात्र पावसाने सर्व गणिते मोडून काढली आणि तब्बल ९ मे ते ८ नोव्हेंबर २०२५ म्हणजेच सलग सहा महिन्यांची मुसळधार उपस्थिती नोंदली. एप्रिल महिन्यापासूनच वातावरणात थंड झुळुकींच्या खुणा जाणवू लागल्या असल्याने हवामानाबद्दल कुतूहल निर्माण झाले होते. उन्हाच्या चटका देणाऱ्या दिवसांत अचानक लागणारा गारवा, सतत हलणारी झाडांची शेंडी, हा उन्हाळ्यातील विरळा अनुभव ठरला.
८ एप्रिल ते १८ एप्रिल या कालावधीत दुपारी उकाडा असतानाच थंड वाऱ्याचा स्पर्श जाणवू लागला. काहींना हे सरळ हवामानबदलाचे लक्षण वाटले तर काहींनी यंदाचा पाऊस नेहमीपेक्षा खूप लवकर येत असल्याची चर्चा केली. १८ एप्रिल रोजी सायंकाळी वादळी झोतांनी धुळीचे लोट उडाले आणि उन्हाळ्यात हिवाळ्याचा अनुभव येत असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिली. मे महिन्यात घटनांना अधिक गती मिळाली. ८ मे रोजी पहिला जोरदार पाऊस, त्यानंतर १२, १४, १६ आणि २० मे रोजी पुन्हा सरी, आणि २० ते २३ मे या दरम्यान सलग पडणारा मुसळधार पाऊस — ज्यामुळे आयएमडीने अधिकृतपणे मान्सून आगमन जाहीर केले.
सामान्यपणे सप्टेंबरमध्ये ‘परतीचा पाऊस’ दिसतो, पण यंदा ऑक्टोबरमध्येही पावसाने कोकणातील पकड सोडली नाही. आयएमडीने १० ऑक्टोबर रोजी देशातून मान्सून माघारी गेल्याचे घोषित केले असतानाही माणगावात पावसाच्या सरी चालूच राहिल्या. २ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० पासून पहाटे २ वाजेपर्यंत अतिवृष्टी झाली. ६ नोव्हेंबरलाही संध्याकाळी मुसळधार सरी बरसल्या आणि सोशल मीडियावर “इतिहासातील सर्वात लांब पावसाळा”, “कदाचित नवीन वर्षातच पाऊस थांबेल”, “सहा महिने पूर्ण झाले” अशा प्रतिक्रिया, टिप्पण्या आणि चर्चांची भरती आली.
८ नोव्हेंबर रोजी दिवसभर उकाडा, आकाशभर दाट ढग आणि दमट हवेतही फक्त हलकी रिमझिम झाली आणि याच दिवसाने अखेर पावसाचा पडदा खाली ओढला. नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर, शेतीवर, वाहतुकीवर, रस्त्यांवर आणि कामकाजावर या सहा महिन्यांच्या पावसाचा मोठा प्रभाव दिसून आला. तज्ज्ञांच्या मते जागतिक तापमानवाढ, समुद्र पृष्ठभागातील बदल, हवेतील आर्द्रता आणि हवामानातील अस्थिरता यामुळे कोकणात अशा प्रकारचे वेगळे हवामान बदल अधिकाधिक दिसत आहेत. त्यामुळे २०२५ चा हा मॉन्सून माणगाव तालुक्याच्या हवामान इतिहासात ‘अभूतपूर्व’ म्हणून नोंदवला जाणार आहे.

