रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या असून सोमवारपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अवघ्या दोन दिवसांत निवडणुकीचा प्रचार सुरू होणार असला तरी राजकीय चित्र अद्यापही स्पष्ट झालेले नाही. कारण पक्षांतर्गत असंतोष, बदललेले आरक्षण आणि स्थानिक मतभेद यामुळे अनेक ठिकाणी गोंधळाचे वातावरण आहे. सत्ताधारी महायुतीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांचा समावेश आहे. मात्र ही युती जिल्ह्यात केवळ “कागदावरची” असल्याचे दिसत आहे. अनेक नगरपालिकांमध्ये शिंदे गट आणि भाजपचे कार्यकर्तेच एकमेकांविरोधात लढत आहेत. तर कर्जतमध्ये राष्ट्रवादी (अजित पवार गट) ठाकरे गटासोबत स्थानिक पातळीवर युती करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे, महाआघाडीतील काँग्रेस, शेकाप, शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (शरद पवार गट) यांच्यातही अजून ठोस हालचाल नाही. काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते परस्परांविरोधात उभे राहतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाआघाडी एकसंध राहील का, हा प्रश्न कायम आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आरक्षणामुळे अनेक नगरपालिकांमध्ये राजकीय गणिते बदलली आहेत. काही विद्यमान नगरसेवकांना नवीन प्रभागातून लढावे लागणार असल्याने नाराजी वाढली आहे. काही नेते अपक्ष म्हणून लढण्याची तयारी करत आहेत. आरक्षण बदलामुळे नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार असली तरी जुन्या नेत्यांवरील विश्वास टिकवायचा की नाही, याबाबत पक्ष गोंधळात आहेत.अर्ज दाखल करण्यास फक्त दोन दिवस शिल्लक असताना जिल्ह्यातील राजकीय समीकरण अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. महायुती आणि महाआघाडी दोन्हीकडेही सर्व काही आलबेल नसल्याने या निवडणुकीत नेमक्या लढती कशा होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

