पनवेल शिवसता टाईम्स (वार्ताहर):-
पनवेल शहरानं आज एक जबाबदार, निर्भय आणि मनाने मोठा पत्रकार गमावला आहे — शिवसत्ता परिवारातील पत्रकार दत्ता मोकल यांच्या निधनानं पत्रकारितेच्या क्षेत्रात दुःखाचं सावट पसरलं आहे. समाजातील समस्यांचा आक्रोश शब्दांतून नव्हे, तर कृतीतून मांडणारा आवाज आज कायमचा थांबला आहे.
दत्ता मोकल हे केवळ पत्रकार नव्हते, तर पनवेलकरांच्या प्रत्येक प्रश्नात उभं राहणारं एक संवेदनशील नाव होतं. स्वार्थाच्या राजकारणात न अडकता, त्यांनी जनतेसाठी आपलं आयुष्य झोकून दिलं. साधं, सरळ, प्रामाणिक आयुष्य — पण जबरदस्त माणुसकी हा त्यांचा स्वभाव होता. आपल्या सवयींमुळे, व्यसनांमुळे कधीच कुणाला त्रास न देणारा आणि नेहमी इतरांच्या मदतीला धावणारा असा हा पत्रकार आज आपल्यात नाही.
शिवसत्ता उपसंपादिका धनश्री रेवडेकर यांनी भावनिक शब्दांत श्रद्धांजली अर्पण करताना सांगितलं,
“दत्ता मोकल माझ्यासाठी केवळ पत्रकार नव्हते, ते माझे भाऊ होते. मी जेव्हा पनवेल भागातून पत्रकारिता सुरू केली, तेव्हाही त्यांनी मला नेहमी सहकार्य केलं. मी लहान असून माझं रिपोर्टिंग आणि कॅमेरा हाताळणं त्यांना खूप आवडायचं. ते नेहमी प्रोत्साहन द्यायचे, ‘तू पुढं जाणारच’ असं म्हणत आत्मविश्वास वाढवायचे.”
त्या पुढे म्हणाल्या, “पंढरपूरमध्ये रिपोर्टिंगच्या वेळी त्यांनी माझी पूर्ण काळजी घेतली. खऱ्या अर्थाने पत्रकारितेचा चेहरा कसा असावा हे त्यांनी दाखवून दिलं.
दत्ता मोकल यांनी पनवेल परिसरातील अनेक समस्या प्रशासनासमोर आणल्या, जनतेचा आवाज बनले आणि पत्रकारितेची प्रतिष्ठा उंचावली.
धनश्री रेवडेकर यांनी सांगितल्याप्रमाणे — आज दत्ता दादा नाहीत, पण त्यांची माणुसकी, प्रामाणिकता आणि लोकांसाठी जगण्याची वृत्ती कायम लक्षात राहील. ते गेले, पण त्यांची शिकवण, त्यांचा स्वभाव आणि त्यांची आठवण कायम राहणार आहे.
दत्ता मोकल — पत्रकारितेचा खरा चेहरा आणि माणुसकीचं जिवंत प्रतीक.
शब्द संपलेत पण आदर नेहमी राहणार.

