रायगड शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
रायगड जिल्ह्यातील आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीत तणाव निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. शिवसेना (शिंदे गट) अजूनही “एकत्र लढूया” या भूमिकेवर ठाम आहे, मात्र मित्रपक्षांच्या वेगळ्या हालचालींमुळे वातावरण तापले आहे.राज्याचे फलोत्पादन आणि रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी मित्रपक्षांना थेट इशारा दिला आहे. ते म्हणाले, जर आपण एकत्र राहिलो नाही, तर जनता आपल्याला आपली जागा दाखवून देईल.सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असली तरी जागावाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही. यावर गोगावले म्हणाले, “महायुती म्हणून आपण एकत्र आलो, तर विरोधकांना रायगडमध्ये संधीच मिळणार नाही. पण जर कोणी स्वबळाची भाषा करत असेल, तर जनता त्यांना नक्कीच उत्तर देईल. शिवसेनेने वास्तववादी प्रस्ताव दिल्याचे गोगावले यांनी सांगितले.ज्या ठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त, तिथे त्या पक्षाला जागा द्याव्यात, असा त्यांचा प्रस्ताव आहे. मात्र हा प्रस्ताव अद्याप मित्रपक्षांनी स्वीकारलेला नाही.खासदार सुनील तटकरे यांनी या प्रस्तावावर प्रतिक्रिया देताना म्हटले होते की, “युती म्हणजे समोरासमोर बसून ठरवायची गोष्ट आहे. यावर गोगावले म्हणाले, अशा विधानांनी एकतेवर परिणाम होतो. तरीही आम्ही संवादासाठी तयार आहोत. भाजपशी आमचे बोलणे सुरू आहे. युती झाली तर उत्तम, नाही झाली तरी आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. गोगावले यांचा हा इशारा सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. ताळमेळ न झाल्यास महायुतीत बंडखोरीची शक्यताही व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, शिंदे गट मात्र “एकीनेच विजय शक्य आहे” या भूमिकेवर ठाम आहे.राजकीय निरीक्षकांच्या मते, रायगडमधील या निवडणुका महायुतीच्या भविष्यासाठी परीक्षा ठरणार आहेत. भरत गोगावले यांच्या वक्तव्याने महायुतीतील मतभेद उघड झाले असून, पुढील काही दिवसांत राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता आहे.

