माणगावात वनविभाग झोपेत,गावकरी रणांगणात… खांदाडच्या तरुणांनी मगरीला पकडून दाखवली हिंमत…

0
6

 माणगाव शिवसत्ता टाइम्स (नरेश पाटील):- 

खांदाड गावात गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या मगरदर्शनाच्या घटनांमुळे ग्रामस्थ भयभीत वातावरणात जीवन जगत होते.अखेर मंगळवारी रात्री गावातील तरुणांनी मोठ्या धाडसाने एक मगर जिवंत पकडून दिलासा दिला.मागील काळात ग्रामस्थांनी वनविभागाचे थेट लक्ष वेधून घेतले, माध्यमांतूनही सातत्याने पाठपुरावा केला, तसेच माणगाव नगरपंचायतचे माजी अध्यक्ष ज्ञानदेव पोवार यांनीही ठोस कारवाईची मागणी केली होती. तरीही फक्त हिरव्या जाळीची फेन्सिंग आणि “सावधान, मगरींची प्राबल्य” अशा फलकापलीकडे ठोस उपाययोजना दिसून आली नाही. त्यामुळे मगरींची संख्या वाढत गेली आणि कोंबड्या, कोंबडे, पिल्ले व लहान पाळीव प्राण्यांवर हल्ले सुरूच राहिले.

दि. ११ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री ८.१० वाजता भीमसेन वलेराव यांच्या घरासमोर मगरीचे दर्शन झाल्याची बातमी पसरताच गावातील असंख्य तरुण घटनास्थळी जमा झाले. मंडळाचे अध्यक्ष महेश पोवार (बाळा डी.जे.) आणि सहकाऱ्यांनी कौशल्याने व कोणतीही इजा न करता मगरीला झडप घालून पकडण्यात यश मिळवले. युवक निखिल वले यांनी आमच्या प्रतिनिधींना माहिती दिली व त्यानंतर तालुका वनअधिकारी प्रशांत शिंदे यांना कळविण्यात आले. वनपथक घटनास्थळी पोहोचले, मात्र आवश्यक पकड उपकरणांचा अभाव असल्याने काही काळ तणाव निर्माण झाला.अखेर गावकऱ्यांनी पकडलेली मगर वनपथकाच्या ताब्यात दिली व नंतर पिंजरा आणून तिला वाहनात सुरक्षितरीत्या हलविण्यात आले.

गावकऱ्यांची मागणी आहे की पकडलेल्या मगरीला दूरवर समुद्रवाहिनीच्या परिसरात सुरक्षित सोडण्यात यावे, अन्यथा ती पुन्हा गावात प्रवेश करू शकते. प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली; सुमारे दहाच्या सुमारास सर्व औपचारिकता पूर्ण झाली. दरम्यान अनेक वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी घटनास्थळी दाखल झाले व ग्रामस्थांचा संताप समोर आला. वनविभागाच्या विलंबित व अपुऱ्या कारवाईविरुद्ध ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.गावकऱ्यांनी स्वतःच्या जिवाची पर्वा न करता मगर पकडली, पण वनविभागाकडून अजूनही ठोस आणि कायमस्वरूपी उपाययोजना दिसत नाहीत. भविष्यात एखादी गंभीर दुर्घटना घडण्यापूर्वी त्वरित पावले उचलावीत,अशी ग्रामस्थांची स्पष्ट मागणी आहे.