अलिबाग शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे बिगुल वाजलेय.महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पहावयास मिळणार आहे.अशातच रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबाग नगरपरिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची व चुरशीची होणार असल्याचे चिन्ह दिसतायेत. अलिबाग नगरपरिषद निवडणुकीत तरुण व उच्चशिक्षित चेहरा मैदानात उतरलाय, शेकाप- मविआ कडून अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आलीय.शेकाप नेते जयंत पाटील व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केलीय.मागील 20 वर्षाहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय. या निवडणुकीत 20 जागा असून थेट नगराध्यक्ष पदासाठी अक्षया नाईक आपलं नशीब आजमावत आहेत. अनेक वर्षे नगराध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे तिचे वडील प्रशांत नाईक यांच्या दमदार व प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगला लाभ होणार असल्याचे बोलले जातेय. त्याच जोडीला महाविकास आघाडीची ताकत देखील मिळणार आहे. अलिबाग अधिकाधिक स्वच्छ, सुंदर व स्मार्ट करण्याचे माझे व्हिजन असून अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अक्षया नाईक यांनी म्हटलंय. राज्य , देश व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणे, युवक, युवती महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक, महिला सक्षमीकरण , पर्यावरण पूरक व्यवसाय,पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती, रस्ते,पाणी आरोग्य,शिक्षण,क्रीडांगण चांगल्या दर्जाचे व्हावे यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचे अक्षया नाईक ने म्हटलंय. याकामी जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला नक्कीच संधी देईल असा विश्वास अक्षया ने व्यक्त केला.

