नवी मुंबई महानगरपालिका प्रभाग क्रमांक २१ भाजपमय; ‘गावावला मुद्दा’ संपूर्ण फेल…

0
14

नवी मुंबई शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-

नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २१ मध्ये काल राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार गणेश नाईक यांच्या जाहीर सभेला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. सभास्थळी तुफान गर्दी उसळली होती, इतकी की संपूर्ण परिसर भाजपमय झाल्याचं चित्र पाहायला मिळालं.

या सभेत बोलताना गणेश नाईक यांनी नवी मुंबई महानगरपालिकेने गेल्या अनेक वर्षांत केलेल्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि मूलभूत सोयीसुविधा यामध्ये भाजपने कसा ठोस विकास केला आहे, हे त्यांनी स्पष्ट शब्दांत मांडले. यापुढील काळातही प्रभाग २१ चा सर्वांगीण विकास कसा साधला जाईल, याचा स्पष्ट रोडमॅप त्यांनी जनतेसमोर ठेवला.

यावेळी माजी महापौर जयवंत सुतार यांनी विरोधकांवर जोरदार टीका करत स्पष्ट भूमिका मांडली. ते म्हणाले, “आम्ही निवडणूक आली म्हणून काम करणारे नाही. आमचं जनसंपर्क कार्यालय १२ महिने, ३६५ दिवस नागरिकांसाठी खुलं असतं. या प्रभागात आम्ही कधीच ‘गावावला-बाहेरचा’ असा भेदभाव केला नाही. विदर्भातून आलेला असो, कोकणातला असो किंवा कुठल्याही भागातून आलेला असो जो इथे राहतो, तो आमचा माणूस आहे. आम्ही प्रत्येकाला समानतेने मदत केली आहे.”

पुढे बोलताना माधुरी सुतार यांनीही विरोधकांच्या कथित ‘गावावला मुद्द्या’वर स्पष्ट शब्दांत नाराजी व्यक्त केली. त्या म्हणाल्या, “या प्रभागात आमची विकासकामं बोलकी आहेत. महिला सक्षमीकरणासाठी आम्ही प्रत्यक्ष काम केलं आहे. मोफत प्रशिक्षण शिबिरं, आरोग्य उपक्रम, महिलांसाठी संधी निर्माण करणारे कार्यक्रम हे सगळं जनतेसमोर आहे. तरीही काही लोक मुद्दाम चुकीचं नॅरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र प्रभागातील जनता इतकी समजदार आहे की ती अशा प्रचाराला बळी पडणार नाही.”

सभेच्या शेवटी उपस्थित नागरिकांमध्ये एकच भावना स्पष्टपणे दिसत होती घोषणांपेक्षा काम महत्त्वाचं,
आणि म्हणूनच प्रभाग क्रमांक २१ मध्ये भाजपचा विकासाचा अजेंडा आणि सुतार पॅटर्न पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर खरा उतरत असल्याचं चित्र निर्माण झालं आहे.सध्या तरी प्रभाग २१ मधील वातावरण पाहता,‘गावावला मुद्दा’ संपूर्ण फेल, आणि भाजपचा विकासाचा विचारच जनतेच्या मनात घर करून बसल्याचं स्पष्ट दिसत आहे.