पनवेल शिवसत्ता टाइम्स (वार्ताहर):-
पनवेल तालुक्यातील नितळस गावात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर वाढला असून, त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.दोन महिन्यांपूर्वी शिवाजी काठे यांच्या गोट्यात बिबट्याने एक कुत्रा ठार झाल्याची घटना घडली होती. त्याची माहिती ग्रामपंचायतीने वनविभागाला फोनवरून दिली होती. मात्र वनविभागाकडून काहीच कारवाई झाली नाही. यानंतर पुन्हा 6 नोव्हेंबर रोजी ग्रामपंचायतीने पुन्हा वनविभागाला कळवलं की प्रकाश गायकर यांच्या घराच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्याचा स्पष्ट दिसणारा व्हिडिओ कैद झाला आहे. तरीसुद्धा वनविभागाकडून कोणतीही कार्यवाही न झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.आज (12 नोव्हेंबर) कुनाल काठे यांना गावात पुन्हा एक बिबट्या वावर करताना दिसला. त्यांनी त्याचे फोटो काढले आणि लगेच ग्रामपंचायतीला माहिती दिली.त्यानंतर समाधान सांगडे या व्यक्तीला दोन बिबटे “बैठक हॉल जवळच्या जंगलात वावर करताना दिसल्याचे सांगितले. ही घटना वारंवार घडल्याने ग्रामस्थ अधिक घाबरले आहेत. ग्रामस्थांनी वनविभागाला तात्काळ घटनास्थळी भेट देऊन बिबट्यांना पकडण्याची मागणी केली आहे. पण वनविभागाने अद्यापही कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने गावकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे.ग्रामस्थांचे म्हणणे आहे की बिबटे गावाच्या हद्दीत वारंवार दिसत आहेत, त्यामुळे आमच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे.वनविभागाने तातडीने जाळे लावून या दोन बिबट्यांना पकडावे.

